खासगी रुग्णालयांत शासनाने ठरवून दिलेल्या दरातच उपचार मिळायला हवे: केंद्रीय प्रमुखांच्या सूचना - In private hospitals, treatment should be provided at the rate fixed by the government | Politics Marathi News - Sarkarnama

खासगी रुग्णालयांत शासनाने ठरवून दिलेल्या दरातच उपचार मिळायला हवे: केंद्रीय प्रमुखांच्या सूचना

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 एप्रिल 2021

खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज.

औरंगाबाद :  जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संर्सगाच्या पार्श्वभूमीवर पर्याप्त प्रमाणात उपचार सुविधांचे नियोजन करताना गृहविलगीकरणातील रुग्णांची योग्य देखरेख आवश्यक असल्याने त्यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना  डॉ. अभिजीत पाखरे ,केंद्रीय  पथक प्रमुख  तथा सहप्राध्यापक, जनऔषध  विभाग, मध्यप्रदेश यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत डॉ. अभिजीत पाखरे बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करतांना पाखरे म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी कोवीडच्या नियमावलीचे पालन प्रत्येकाने योग्य पध्दतीने केले तर निश्चितच संसर्ग वाढ थांबविता येईल.

त्यादृष्टीने जनजागृती करुन लोकांकडून नियमांचे पालन प्रभावीरित्या करुन घेण्यात यावे. तसेच कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करणे गरजेचे असून गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराबाबत योग्य पद्धतीने देखरेख होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असून ते अधिक प्रभावीपणे करावे, असेही पाखरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

लसीकरण मोहीमेची माहिती घेऊन अधिक व्यापक प्रमाणात चाचण्या आणि लसीकरण मोहीमेची अमंलबजावणी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.  जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे राबवल्या जात असलेल्या प्रतिबंधात्मक उपाय योजना चाचण्यांचे प्रमाण,संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या, शोध, खासगी ,शासकीय आरोग्य सुविधांमध्ये वाढ, कन्टेनमेंट झोन व्यवस्था यासह इतर उपाययोजना बाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी डाॅ. पाखरे यांना दिली. 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख