शिवसेना, भाजप, मनसे असा राजकीय प्रवास करणाऱ्या प्रकाश कौडगेंच्या निधनाने शोककळा

महिनाभरापूर्वीच कौडगे यांना कोरोनाने गाठले होते. पण यावर मात करत ते पुन्हा सक्रीय झाले होते.
Nanded Mns President Prakash Kaudge News
Nanded Mns President Prakash Kaudge News

नांदेड ः मनसेचे  जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे (५२) यांचे हैद्राबाद येथे उपचारा दरम्यान आज (ता.१५)  पहाटे सहाच्या सुमारास निधन झाले. शिवसेना, भाजप, शिवसेना अन् मनसे असा राजकीय प्रवास असलेले कौडगे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. सर्वाधिक काळ शिवसेनेत घालवलेल्या कौडगे यांच्या काळातच नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची भरभराट झाली. परंतु मध्यंतरी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या अचानक जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रकाश कौडगे यांची राजकीय सुरवात १९९० मध्ये शिवसेना प्रवेशाने सुरू झाली. १९९६ साली शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदी त्यांची नेमणूक झाली आणि जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबुत होत गेली. सर्वाधिक काळ जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यावेळचे मराठवाडा संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांच्या शिफारशीवरुन कौडगे यांच्यावर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती. 

१९९७ साली नांदेड वाघाळा महानगरपालिकेवर त्यांच्याच कार्यकाळात शिवसेनेचा भगवा फडकला. सध्याचे खासदार हेमंत पाटील हे स्थायी समितीचे सभापती झाले होते. नांदेड जिल्हा परिषदेवर देखील त्यांच्याच काळात  भगवा फडकला, व जनाबाई डुडूळे,  बाबाराव एंबडवार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. शिवसेनेची घौडदौड याच काळात वेगाने सुरु होती.

वेगवेगळ्या पंचायत समित्या, व जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व निर्माण करण्यात कौडगे यांचा सिंहाचा वाटा होता. परंतु त्यानंतर त्यांचे पक्षातील नेत्यांशी बिनसले आणि त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. पुढे भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी नव्याने राजकारणाला सुरूवात केली. पण तिथे ते फारकाळ रमले नाहीत, पुन्हा त्यांनी घरवापसी केली .

पण शिवसेनेत पुर्वी असलेला मान, सन्मान त्यांना नव्हता. ते पुन्हा नव्या पक्षाच्या शोधात होते. राज ठाकरे यांच्याशी ओळख आणि संपर्क असल्यामुळे त्यांनी मनसेचा पर्याय स्वीकारला. मनसेला देखील कौडगे यांच्या रुपाने चांगले आणि आक्रमक नेतृत्व नांदेडमध्ये मिळाले होते. त्यांच्यावर राज ठाकरे यांनी थेट जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली.

वेगवेगळे विषय हाती घेत कौडगे यांनी आक्रमक आंदोलने केली. त्यामुळे मनसेची जिल्ह्यात ओळख निर्माण झाली. अलीकडच्या काळात त्यांनी नांदेड शहरात महात्मा बसवेश्वरांचा भव्य अश्वरूढ पुतळा उभारण्यात यावा, यासाठी त्यांनी महापालिकेवर भव्य मोर्चाही काढला होता. त्याला यश देखील आले.

महिनाभरापूर्वीच  कौडगे यांना कोरोनाने गाठले होते. पण यावर मात करत ते पुन्हा सक्रीय झाले होते. परंतु  त्यानंतर इतर आजारामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. हैद्राबाद येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,सून, तीन भाऊ असा परिवार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com