बेजबाबदार भाजपचा हिशेब जनता चुकता करेल.. - The people will punish of irresponsible BJP | Politics Marathi News - Sarkarnama

बेजबाबदार भाजपचा हिशेब जनता चुकता करेल..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

'सरकार चुकते तिथे, मार्गदर्शन केले पाहिजे. त्यात राज्य संकटात असतांना तर यांच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा होती. परंतु सरकारला 'कोरोना' लढाईत साथ देण्याऐवजी, फक्त विचलित करुन बदनाम करण्याचे मनसुबे वैयक्तिक महत्वकांक्षेच्या आहारी जावून काही लोकं करतांना दिसत आहे.

औरंगाबादः कोरोनासारख्या संकटाच्या काळात राजकारण करणारा इतका बेजबादार विरोधीपक्ष महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिला नव्हता, राजभवाना आडून महिनाभर सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात तोंडावर आपटल्यानंतर आता महाराष्ट्र बचाव आंदोलन करणाऱ्या बेजबाबदार भाजपचा जनता येणाऱ्या काळात हिशेब चुकता केल्याशिवाय राहाणार नाही, अशा शब्दांत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी इशारा दिला आहे.

राज्यातील कोरोना रग्णांची वाढती संख्या आणि होणारे मृत्यू याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा नियोजन शून्य कारभार जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन केले. तोंडावर काळ्या पट्या, आणि काळे कपडे परिधान करत भाजपच्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्यात, सरकार विरोधात आंदोलन केले. या मुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसने देखील भाजपला जशास तसे उत्तर देण्याचा काही ठिकाणी प्रयत्न केल्याचे दिसून आले. 

या पार्श्वभूमीवर मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी तिखट शब्दांत भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेतला. सतीश चव्हाण म्हणाले, भाजपच्या वतीने आज 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात येत आहे. संकट काळी राजकारण करणारा इतका बेजबाबदार विरोधी पक्ष महाराष्ट्राने आजपावतो पाहिला नव्हता. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आणि देशाला दिशादर्शक आहे. हे आपण नेहमीच बोलतो. परंतु या परंपरेला हरताळ फासण्याचे काम राज्यातला विरोधी पक्ष करीत आहे.

आज देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र तरी देखील राज्य शासन अतिशय संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळत आहे. केंद्राने सुरुवातीच्या काळात 'लॉकडाऊन' करतांना नियोजन शून्यतेचे दर्शन देशाला घडविले. त्यातून प्रश्न सुटायचे तर नवे प्रश्न निर्माण झाले. ते सगळे भयवाह चित्र जगाने पाहिले. राज्यांना ते निस्तरावे लागले. परंतु त्याविषयी 'ब्र' काढण्याची हिंमत राज्यातील भाजप नेत्यांमध्ये आहे काय? उलट राज्यशासनाच्या कार्याचे जनता कौतुक करीत असतांना, नाजूक प्रसंगी यांची पोटदुखी सुरु झाली. 

कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवणारी कृती हवी..

सुरुवातीला राजभवना आडून महिनाभर सरकार अस्थिर करण्याचे कटकारस्थान रचली. त्यात तोंडावर आपटले. तर पुन्हा 'महाराष्ट्र बचाव'च्या नावाने बोंबा मारण्याचे सोंग करु लागले. विरोधी पक्षाने लोकशाहीत जबाबदारीने वागलेच पाहिजे. 'सरकार चुकते तिथे, मार्गदर्शन केले पाहिजे. त्यात राज्य संकटात असतांना तर यांच्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा होती. परंतु सरकारला 'कोरोना' लढाईत साथ देण्याऐवजी, फक्त विचलित करुन बदनाम करण्याचे मनसुबे वैयक्तिक महत्वकांक्षेच्या आहारी जावून काही लोकं करतांना दिसत आहे. त्यांना काही विधायक दृष्टी देण्याचा, स्वार्थापलीकडे जावून समाजहिताचा मार्ग स्वःपक्षातील जाणत्या लोकांनी दाखवला पाहिजे.

शासनाच्या कामाचे जसे लोकं मूल्यमापन करतात तसेच विरोधी पक्षाच्या कामाचेही करतात याचे भान भाजपने ठेवावे. त्यासाठी समाजमाध्यमातून स्वतःच्या पोस्टखाली सामान्य जनतेच्या प्रतिक्रियांना वाचून काही बोध घ्यावा. हा महाराष्ट्र आहे, इथे चांगलेच अधिक काळ टिकते. बाकी सगळं तात्कालिक. त्यामुळे कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढून आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी यांचे मनोबल उंचावेल अशीच कृती विरोधी पक्षाकडून अपेक्षित आहे. अन्यथा जनता तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख