लूट थांबवा, कोरोनापेक्षा त्याच्या महागड्या खर्चाच्या ओझ्यानेच लोक मरतील..

एक कुटुंब त्यांच्या घरातील मुलगी, पत्नी आणि नंतर स्वतः तो दगावला. घरात त्यांच्या नावाने दिवा लावायला देखील कुणी उरले नाही, एवढी भयानक परिस्थिती कोरोनामुळे ओढावली आहे.
Shivsena Mla Sanjay Sirsat News Aurangabad
Shivsena Mla Sanjay Sirsat News Aurangabad

औरंगाबाद ः राज्य सरकार, पोलीस, आरोग्य, वैद्यकीय यंत्रणा जिल्हा प्रशासन आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कोरोच्या विरोधात लढतो आहोत. तुम्ही सगळे जीवापाड मेहनत घेत आहात, पण जर खाजगी रुग्णालये आणि तिथे कोरोना रुग्णांची होत असलेली लूट जर आपण रोखू शकलो नाही, तर हे सगळं व्यर्थ ठरेल. कोरोनापेक्षा त्यावरील उपचारासाठी येणारा खर्च, सर्वसामान्यांना काढावे लागत असलेले कर्ज याच्या ओझ्यानेच लोक मरतील, अशी भिती शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत शिरसाट यांनी खाजगी रुग्णालायांकडून कोरोनावर  उपचार घेत असलेल्या रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या बीलाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. यासाठी शिरसाट यांनी आपल्या सख्या भावासह मतदारसंघातील एक कुटुंब जे कोरोनामुळे दगावले, त्याचे उदाहरण देखील दिले.

संजय शिरसाट म्हणाले, कोरोनापेक्षा त्यावरील उपचार भयंकर अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे, प्रशासन म्हणून तुम्ही आणि राज्य सरकार त्याविरोधात लढा देत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची भूमिका बजावतो आहे, पण या लढ्याला काही खाजगी रुग्णालयातील गैप्रकारांमुळे अपयश येत आहे.

ज्यांच्याकडे पैसा आहे, जे खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेऊ शकतात, त्यांची अडचण नाही, पण ज्यांना खाजगी रुग्णालयातील उपचार परवडू शकत नाही, पण जीव वाचवण्यासाठी तिथे दाखलच व्हावे लागते, अशा गरीब, सामान्य रुग्णांकडे आपण गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. एखादा रुग्ण आला म्हणजे आठवड्याभराचे बुकिंग झाले, अशा पद्धतीने काही रुग्णालये वागत आहेत.

कोरोना रुग्णांना अटॅक कसा येतो?

बेड नाही असे सांगून आधी जनरल वार्डात आणि मग काही दिवसांनी कोरोना किंवा आयसीयूमध्ये त्याला भरती केले जाते. रेमडेसिविर इंजेक्शन कुणाला, किती प्रमाणात द्यावे लागते, त्याचा दुष्परिणाम काय हे आता समोर येऊ लागले आहे. कोरोनाच्या अनेक रुग्णांचा मृत्यू हा ह्दयविकाराच्या झटक्याने झाल्याचे त्याच्या नातेवाईकांना सांगितले जाते. रेमडेसिविरच्या डोसने रुग्णाच्या शुगरचे प्रमाण प्रचंड वाढते आणि त्यातून त्याला अटॅक येतो असे देखील बोलले जाते.

त्यामुळे रेमडेसिविरची खरंच रुग्णाला गरज आहे का? हे पाहूनच ते देण्याचा आग्रह धरला गेला पाहिजे. खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णाचे आठ दिवसांचे बील हे कमीत कमी तीन ते चार लाख रुपये इतके येते. ज्या माणसाने आपल्या आयुष्यात एक लाख रुपये कधी एकत्रित पाहिले नाही, असा माणूस हे बील कसे भरू शकेल याचा आपण विचार केला पाहिजे. कोरोनापेक्षा त्यावरील उपचारासाठी येणारा खर्च आणि तो करण्यासाठी काढावे लागणारे कर्ज याच्या ओझ्यानेच लोक मरतील, अशी भिती देखील संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.

काही रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन तब्बल ९० हजार रुपयांना रुग्णांना दिले गेले,या शिवाय डिस्चार्ज देतांना घरी घ्यावयाची काळजी या नावाखाली मास्क, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर व इतर साहित्याचे एक कीट दिले जाते. त्यासाठी  देखील ७ हजार रुपये खाजगी रुग्णालये आकारतात, त्याची बिले मी पाहिली आहेत, असा दावा देखील शिरसाट यांनी केला.

खाजगी रुग्णालयातील यादी मागवा..

माझ्या मतदारसंघातील एक कुटुंब त्यांच्या घरातील मुलगी, पत्नी आणि नंतर स्वतः तो दगावला. घरात त्यांच्या नावाने दिवा लावायला देखील कुणी उरले नाही, एवढी भयानक परिस्थिती कोरोनामुळे ओढावली आहे. अशावेळी खाजगी रुग्णालयांकडून आकारले जात असलेले लाखोंचे बील अत्यंत बारकाईने तापासून त्यावर अंकूश लावण्याची खरच गरज आहे. तरच आपले प्रयत्न फळाला येतील.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे दररोज खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेऊन किती पेशंट घरी गेले, त्यांची नाव आणि बिलासह संपुर्ण यादी आली पाहिजे, अशी आग्रही मागणी शिरसाट यांनी यावेळी केली. शिरसाट यांच्या मागणीची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना खाजगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या बीलांची यादी मागवण्याच्या व त्या तपासण्याच्या सूचना दिल्या. खाजगी रुग्णालयातील बीलांचे आॅडीट करणाऱ्या समितीने देखील ते नियमित करावे आणि काही ठिकाणी अचानक जाऊन तपासणी करावी, असे देखील सांगितले.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com