माणसं किड्या-मुंग्या सारखी मरतायेत, सरकार लक्ष देत नाही? आमदार मुटकुळे बसले उपोषणाला - People are dying like ants, why shouldn't the government pay attention? The MLAs went on a hunger strike | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

माणसं किड्या-मुंग्या सारखी मरतायेत, सरकार लक्ष देत नाही? आमदार मुटकुळे बसले उपोषणाला

संदीप नागरे
मंगळवार, 20 एप्रिल 2021

राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आमदार मुटकुळे यांना फोन करून काही मागण्या मान्य केल्याचे सांगत उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र मुटकुळे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

हिंगोली ः जिल्ह्यात संचारबंदी असतांना भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उपाेषणाला बसले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आॅक्सिजन, रेमडेसिविर, बेड अभावी किड्या-मुंग्यासारखी मरत आहेत. इकडे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार यांना लक्ष द्यायला वेळ नाही. मग मी आवाज उठवू नको तर काय करू, असे म्हणत मुटकुळे यांनी समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बिकट परिस्थीती आहे. रुग्णांना इंजेक्शन मिळत नाहीये, आॅक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे, उपचारासाठी बेड उपलब्ध नाहीत, अशा परिस्थितीत हिंगोली जिल्ह्याकडे सत्ताधाऱ्यांचे अजिबात लक्ष नाही, असा आरोप मुटकुळे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकार असल्याने जिल्ह्यातील सगळेच नेते सत्तेत आहे, मग विरोधक म्हणून या परिस्थिती विरोधात मी आवाज उठवू नको तर काय करू? असा संतप्त सवाल देखील मुटकुळे यांनी उपस्थित केला.

हिंगोलीमध्ये कोरोना बाधित रुग्णांना सोयीसुविधा व योग्य उपचार मिळत नसल्याचा आरोप करत चक्क संचारबंदी काळात भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह माजी आमदार गजानन घुगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. दुपारी बारा वाजल्यापासून या उपोषणाला सुरुवात झाली असून जोपर्यंत जिल्ह्यात  रेमडिसिव्हर , व्हेंटिलेटर , व पुरेसा ऑक्सीजनचा साठा प्रशासनाकडून उपलब्ध होणार नाही, तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा मुटकुळे यांनी घेतला आहे. 

मुटकुळे यांच्या या  आक्रमक पावित्र्याने पोलीस व प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे, दरम्यान, राज्याचे अन्न व औषध खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आमदार मुटकुळे यांना फोन करून काही मागण्या मान्य केल्याचे सांगत उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र मुटकुळे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. प्रसार माध्यमांशी बोलतांना मुटकुळे यांनी जिल्ह्यातील सत्ताधारी नेते, लोकप्रतिनिधी यांच्यावरही टीका केली.

मुटकुळे म्हणाले. जिल्ह्यात आजच्या घडीला चारशेवर कोरोना रुग्ण हे अत्यावस्थ आहेत. त्यांना रेमडेसिविर इंजेक्शनची गरज आहे, प्रत्यक्षात जिल्ह्यात ८५ ते १०० एवढेच इंजेक्शन आहेत. मग हे रुग्ण कसे वाचतील. हीच परिस्थिती आॅक्सिजन, बेडच्या बाबतीत देखील आहे. कळमनुरी येथे आलेले वीस व्हेंटिलेटर महिनाभरापासून वापराविना पडून असल्याचा आरोपही मुटकुळे यांनी केला. कोरोना सेंटरमध्ये प्यायला पाणी देखील नाही, मग आशावेळी आम्ही गप्प कसे बसायचे, आणि म्हणून आम्ही उपोषणाचा निर्णय घेतल्याचे मुटकुळे म्हणाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख