तुम्ही ज्यांना जबाबदारी दिली ते अपयशी, पवार साहेब, अजितदादा, बीडकडे लक्ष द्या.. - Pay attention to Pawar Saheb, Ajit Dada, Beed who failed to give you the responsibility. | Politics Marathi News - Sarkarnama

तुम्ही ज्यांना जबाबदारी दिली ते अपयशी, पवार साहेब, अजितदादा, बीडकडे लक्ष द्या..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 एप्रिल 2021

आपण राजकारणापेक्षा कधीही जनतेच्या हिताला प्राध्यान्य दिले. प्रसंगी कठोर भूमिका घेतली.

औरंगाबाद ः शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्यांच्यावर बीड जिल्ह्याची जबादारी दिली आहे, ते अपयशी ठरले आहेत, त्यांना लोकांच्या जीवापेक्षा राजकारणातच अधिक रस आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना पाया पडून देखील रेमडिसिव्हर इंजेक्शन, आॅक्सीजन मिळत नाहीये. माझी शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्र्याकडेही हात जोडून विनंती आहे, की माझ्या बीड जिल्ह्यातील लोकांची होणारी हेळसांड थांबवा, असे आवाहन करत भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा  आपले बंधू व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

अंबाजोगाई शासकीय रुग्णालयाच्या एकाच रुग्णवाहिकेत तब्बल २२ कोरोना मृतांचे मृतदेह कोंबल्याच्या प्रकारावर संताप व्यक्त करणारा एक व्हिडिओ पंकजा मुंडे यांनी फेसबुकवरून जारी केला आहे. अंबाजोगाईतील या प्रकाराबद्दल संताप आणि मृतांबद्दल दुःख व्यक्त करतांनाच त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील नाव न घेता जोरदार टीका केली.

पकंजा मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती भयंकर आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना एका इंजेक्शनसाठी प्रशासनातील लोकांच्या पाया पडावे लागत आहे. मेडिकलचालक, डाॅक्टरांकडून नोंदणी करून देखील रेमडिसिव्हर इंजेक्शन दिले जात नाहीयेत, कारण त्यांना आदेश नाहीत. डाॅक्टरांना बोलण्याचा अधिकार नाही, जिल्हा प्रशासन दबावाखाली काम करत आहे. बीड जिल्ह्यातील लोकांची अशी हेळसांड याआधी कधीच झाली नव्हती.

परळीतील एका डाॅक्टला देखील रेमडिसिव्हिरचे इंजेक्शन मिळाले नाही. बीडच्या जिल्हा रुग्णालयात आॅक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू झाला. एकीकडे हे सगळं सुरू असतांना जिल्ह्यातील सत्ताधारी मात्र राजकारण करण्यात व्यस्त आहेत. अजित पवार यांनी रेमडिसिव्हर इंजेक्शन कुणाच्या खिशातून जाता कामा नये असे म्हटले होते, पण इथे नोंदणी करून देखील ते रुग्णांना दिले जात नाही. कुणी बोलायला तयार नाही, चौकशी केली तर ती कशी दडपायची याचा अनुभव जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांना चांगलाच आहे.

तेव्हा माझी शरदचंद्र पवार साहेब, अजितदादा व मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, की त्यांनी जातीने बीड जिल्ह्याकडे लक्ष द्यावे. तुम्ही ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे, ते अपयशी ठरले असून कोरोनासारख्या महामारीत देखील ते राजकारण करत आहेत, असा आरोप देखील पंकजा मुंडे यांनी केला. आपण राजकारणापेक्षा कधीही जनतेच्या हिताला प्राध्यान्य दिले. प्रसंगी कठोर भूमिका घेतली, त्यामुळे माझे राजकीय नुकसान देखील झाले, पण आपण भूमिकेशी तडजोड केली नाही? असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख