पंकजा मुंडे माझ्या नेत्या आहेत, आणि यापुढेही राहतील.. - Pankaja Munde is my leader, and will continue to be | Politics Marathi News - Sarkarnama

पंकजा मुंडे माझ्या नेत्या आहेत, आणि यापुढेही राहतील..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

मला दोनवेळा विधानसभेची उमेदवारी दिली, पण प्रस्थापितांच्या विरोधातील संघर्षात मला यश मिळाले नाही. पण मुंडे साहेबांच्या नेतृत्वात गोरगरीब, कष्टकऱ्यांसाठी काम करता आले. मुंडे साहेबांनंतर पकंजा ताईच्या नेतृत्वाखाली देखील मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो आहे.

औरंगाबादः विधान परिषदेवर नुकतीच बिनविरोध निवड झालेले भाजपचे आमदार रमेश कराड यांनी नुकतीच गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे या आपल्या नेत्या होत्या, आहेत आणि यापुढेही राहतील, असे सांगत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना पुर्णविराम दिला. पंधरा वर्षाच्या राजकीय जीवनात गोपीनाथ मुंडे यांनीच आपल्याला संघर्ष करायला शिकवले, त्यांच्यानंतर पंकजा मुंडेच्या नेतृत्वाखाली मी काम केल्याचेही कराड यांना सांगितले.

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवरून बरेच राजकारण रंगले होते. दिल्लीतील नेत्यांनी जाहीर केलेल्या चार नावांमध्ये ऐनवेळी बदल करून नांदेडच्या डॉ. अजित गोपछडे यांची उमेदवारी रद्द करून ती पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश कराड यांना देण्यात आली. राज्यातील एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सारख्या दिग्गजांची उमेदवारी कापल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतरच्या आरोप प्रत्यारोपांनी राज्यातील जनतेचे चांगलेच मनोरंजन झाले.

रमेश कराड यांच्या उमेदवारीवरून देखील अनेक तर्क लढवले गेले. पंकजा मुंडे यांचे खच्चीकरण करण्यासाठीच त्यांच्या समर्थक असलेल्या कराडांना उमेदवारी देण्यात आली असे बोलले गेले. तर पंकजा यांनी भाजपचा चौथा उमेदवार पाडण्याची तयारी करत डावलल्याचा राग काढण्याची तयारी केली होती, अशीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि रमेश कराड यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे चित्र आहे. पण आमदार झाल्यावर रमेश कराड यांनी गोपीनाथ गड गाठत समाधीस्थळाचे दर्शन घेतले, आणि पंकजा मुंडे याच भविष्यात देखील आपल्या नेत्या असतील असे सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

मुंडे साहेबांनी संघर्ष शिकवला..

गोपीनाथ गडावर बोलतांना रमेश कराड यांनी आपल्या पंधरा वर्षाच्या राजकीय जीवनात गोपीनाथ मुंडे यांनी आपल्याला संघर्ष करायला कसे शिकवले हे आवर्जून सांगितले. कराड म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच माझी राजकीय जडणघडण झाली. साहेबांनीच मला दोनवेळा विधानसभेची उमेदवारी दिली, पण प्रस्थापितांच्या विरोधातील संघर्षात मला यश मिळाले नाही. पण मुंडे साहेबांच्या नेतृत्वात गोरगरीब, कष्टकऱ्यांसाठी काम करता आले. मुंडे साहेबांनंतर पकंजा ताईच्या नेतृत्वाखाली देखील मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतो आहे.

विधान परिषदेच्या निमित्ताने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी देऊन मला पुन्हा एकदा सेवेची संधी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्य आणि केंद्रातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार असल्याचेही कराड यांनी यावेळी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख