देशातील जनतेच्या उद्रेकाचा स्फोट २०२४ मध्ये निश्चित- संजय राऊत

देशात जो कुणी आपल्या विचाराचा नाही, त्याला संपवण्याचे घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी मुलाखतीच्या सुरूवातीलाच केला.
Shivsena Leader Sanjay Raut News Aurangabad
Shivsena Leader Sanjay Raut News Aurangabad

औरंगाबाद ः या देशात, जगात सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आलेला नाही. सद्दाम हुसेन, हिटलर देखील राहिले नाहीत. सदैव मीच ही मस्ती सहन केली जात नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये कदाचित झाले नाही, पण २०२४ मध्ये देशात परिवर्तन निश्चित घडेल. एक पत्रकार आणि लेखक म्हणून मला ते दिसतयं, लोक बदल घडवतील असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.

औरंगाबाद येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांची प्रकट मुलाखत पार पडली. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकार, देशातील सद्य परिस्थिती यावर भाष्य केले. मोदी सरकार, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह येऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणुका या संदर्भात शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ईडी, सीबीआय सारख्या संस्थाचा सुरू असलेला दुरुपयोग आणि देश पातळीवर मोदी सरकारच्या विरोधात भक्कम आघाडी उभी राहण्यासाठी, त्याचे नेतृत्व कुणाकडे असावे, यावर देखील आपले मत मांडले.

देशात जो कुणी आपल्या विचाराचा नाही, त्याला संपवण्याचे घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी मुलाखतीच्या सुरूवातीलाच केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचा पक्ष भाजप नेहमीच नेहरूंच्या विरोधात बोलत असतो. गेल्या ६०-७० वर्षात देशात काहीच झालं नाही असा दावा त्यांच्याकडून केला जातो. पण त्याच नेहरूंनी आपल्या मंत्री मंडळात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांसह चार अशा व्यक्तींचा समावेश केला होता, ज्यांचा काॅंग्रेस पक्षाशी काडीचाही संबंध नव्हता. विरोधकांना आणि त्यांच्या विचारांना देखील नेहरू मान देत होते.

इंदिरा गांधी यांनी देखील आज जसे देशात राजकारण सुरू आहे, तसे कधी केले नाही. त्यामुळे आज देशात जे वातावरण आणि सुडाचे राजकारण सुरू आहे, ते फारकाळ टिकणार नाही याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. विरोधकच निर्माण होऊ द्याचा नाही, यासाठी देशातील राज्यकर्ते सतत काम करत असतात अशावेळी राष्ट्रीय स्तरावर एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. उद्धव ठाकरे यांनी आता राष्ट्रीय राजकारणात गेलं पाहिजे, असं मी त्यांना नेहमी म्हणत असतो. महाराष्ट्रात त्यांच नेतृत्व दिसले आहे.

राहुल गांधी प्रामाणिक नेता..

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी हे प्रामाणिक नेते आहेत. पण दिल्लीतील राज्यकर्त्यांनी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विरोधक निर्माण होऊच द्यायचा नाही हे संसदेत विरोधी पक्षनेते पद मिळू न देऊन सत्ताधाऱ्यांनी दाखवले आहे. जिथे जिथे काॅंग्रेसची सत्ता आहे तिथे तिथे काॅंग्रेस फोडण्याचे काम सुरू आहे. राज्यकर्त्यामध्ये जो दिलदारपणा असयाला हवा तो केंद्रातील सत्ताधारी नेत्यांमध्ये नाही, अशी टीका देखील राऊत यांनी केली.

ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा सर्वाधिक गैरवापर आता देशात सुरू आहे. देशा बाहेरील काळा पैसा भारतात आणणे, भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवणे हे खरे या संस्थांचे काम आहे. पण गेल्या पाच-सहा वर्षात काळ्या पैशाचा एक रुपयाही आला नाही. काॅंग्रेसच्या काळात देखील या संस्थाचा इतका गैरवापर कधी झाला नव्हता. महाराष्ट्रात भाजप विचारांचे सरकार येऊ दिले नाही, त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मी हिरावून घेतला म्हणून माझ्या मागे ईडी लावली, पण आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

राज्यपाल दिल्लीचे एजंट..

संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्ययारी यांच्यावर देखील टीका केली. राज्यपाल हे दिल्लीचे एजंट असल्या सारखे वागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जे असहकाराचे धोरण अवलंबले आहे, त्यावरून राजभवनाचे वेळोवेळी अधपतन झाल्याचे दिसून आले. आपल्या विचारांचे सरकार आणण्यासाठीच त्यांची नियुक्ती झाली आहे का? असा प्रश्न यामुळे सहाजिकच पडतो.

कोश्यारी हे संघाचे प्रचारक होते, एका राज्याचे ते मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. राज्यपालांची नियुक्ती जरी केंद्र सरकारकडून केली जात असली तरी त्यांची भूमिका ही सर्वांना न्याय देण्याची असली पाहिजे. पण महाराष्ट्रात आपल्या विचारांचे सरकार नाही यातून राजभवनाचीही तडफड सुरू आहे का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला. विधीमंडळाने केलेल्या ठरावानंतर १२ आमदारांची यादी पायाशी घेऊन बसणे योग्य आहे का? संविधानाला धरून आहे का? तुम्ही संविधान मानता की नाही? असा प्रश्न देखील राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com