`अन्यथा एकाच सरणावर २५ लोकांचे अंत्यविधी करावे लागतील..` - Otherwise 25 people will have to be cremated at one place | Politics Marathi News - Sarkarnama

`अन्यथा एकाच सरणावर २५ लोकांचे अंत्यविधी करावे लागतील..`

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 एप्रिल 2021

कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यात आणि उपाय योजना करण्यात यंत्रणा म्हणून आम्ही कमी पडल्याची कबूली देत लोकांनीही अजिबात काळजी घेतली नाही असे सांगत आता कात झटकून कामाला लागण्याच्या सुचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.

बीड : लॉकडाऊनशिवाय आता मार्ग नाही हे निश्चित झालंय, लोकांनाही हे पटले आहे. लॉकडाऊन लावले तरच ही चेन तुटू शकते, अन्यथा मधल्या काळात एका सरणावर नऊ जणांचा अंत्यविधी करावा लागला. लॉकडाऊन केले नाही तर २५ जणांचा अंत्यविधी एका सरणावर करावा लागेल, असा धोक्याचा इशारा,पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. 

सोमवारी (ता. १२) मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना उपाय योजनांची आढावा बैठक झाली. आमदार सुरेश धस, लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, बाळासाहेब आजबे, संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार आदींची यावेळी उपस्थिती होती.

रुग्णसंख्या अटोक्यात आल्याने लोखंडीच्या रुग्णालयातील बेड संख्या कमी करण्यात आली. आता या ठिकाणी बेड संख्या व ऑक्सीजन बेडसंख्या तातडीने वाढविण्यात येईल. तालुका स्तरावर मंगल कार्यालये किंवा तत्सम आस्थापना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या साहाय्याने ताब्यात घेऊन तिथे विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात येणार  असल्याचे सांगतानाच गरजेनुसार खासगी रुग्णालयेही ताब्यात घेणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

कोरोना विषयक नियम पाळणे सर्वांची जबाबदारी आहे. लोक बऱ्या बोलाने ऐकत नसतील तर कठोर भूमिका घ्या. रुग्णांच्या व्यवस्थापणापासून ते इतर सर्वच बाबींमध्ये प्रशासकीय व्यक्तीकडून हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यास त्यावर कारवाई केली जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख