लाॅकडाऊनमध्ये दुकान चालू ठेवले म्हणून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू - One died in a beating as he continued to shop in the lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

लाॅकडाऊनमध्ये दुकान चालू ठेवले म्हणून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

पोलिस स्टेशनमध्ये नेत असतांना रस्त्यातच खाली पडून फिरोज खानचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

औरंगाबाद ः ब्रेक द चेन अंतर्गत शहरात निर्बंध लागू आहेत. असे असतांना उस्मानपूरा भागातील एक सलून सुरू असल्यामुळे पोलिसांनी संबंधितावर कारवाई केली. परंतु पोलीस स्टेशनमध्ये नेत असतांनाच सलून चालकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांच्या मारहाणीतच सलून चालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.

संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेत उस्मानपूर पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. ऐन रमझानच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडल्याने या भागात तणावाचे वातावरण होते.

औरंगाबाद शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद आहेत. उस्मानपुरा भागात फिरोज खान या तरुणाचे सलून आहे. दुकान उघडण्यास परवानगी नसतांना त्याने आपले सलून उघडले होते. याचा माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा त्यांनी रात्री फिरोज खान यांच्या दुकानावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

पोलिस स्टेशनमध्ये नेत असतांना रस्त्यातच खाली पडून फिरोज खानचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. आज सकाळी जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा फिरोजच्या नातेवाईकांसह या भागातील नागरिकांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्येच फिरोज खान, कदीर खानचा मृत्यू झाला असून संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी आक्रमक भूमिका जमावाने घेतली.

इम्तियाज जलील घटनास्थळी

त्यामुळे दुपारी उस्मानपुरा पोलिस स्टेशन भागात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. तेव्हा उपस्थितांनी फिरोज खानचा मृत्यू हा पोलिांच्या मारहाणीतच झाल्याचा दावा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्तांशी संपर्क साधून या प्रकरणातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

तातडीने संंबंधितांची बदली उस्मानपूर पोलिस स्टेशनमधून कंट्रोल रुमला करून मृतदेहाचे पोस्टमार्टम करावे आणि संबधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर इम्तियाज जलील यांनी पोलिस स्टेशनसमोर जमलेल्या जमावाला आश्वस्त करत मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवू  देण्याची विनंती केली.

पोस्टमार्टम अहवालातूनच सत्य परिस्थिती व मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी जमवाला पटवून दिले. त्यानंतर फिरोज खान याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख