कोरोनाचा आकडा सात हजार पार, पण रोजची रुग्ण संख्या घटली..

ग्रामीण आणि शहरी भागात मिळून ८८ नव्या रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये महापालिका हद्दीतील ६७ तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. ७०९७ एकूण बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत या आजारातून बरे होऊन परतणाऱ्याचे प्रमाण निम्मे म्हणजे ३५७१ एवढी आहे.
aurangabad corona news
aurangabad corona news

औरंगाबादः जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आज सात हजारा पार गेला असला तरी गेल्या आठवडाभरापासून दैनंदिन रुग्ण संख्येत आज मात्र कमाली घट झाली आहे. आज सकाळी कालच्या रुग्णसंख्येत ८८ ने वाढ झाली आहे, परंतु दररोज होणाऱ्या दोनशेहून अधिक रुग्ण संख्येपेक्षा ही कितीतरी कमी असल्याने औरंगाबादकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७०९७ एवढी झाली आहे.

शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधित व मृतांची वाढती संख्या लक्षात घेता काल झालेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत १० ते १८ जुलै दरम्यान, शहरात कडक जनता कर्फ्यू लागू करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आज नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे पहायला मिळाले.

ग्रामीण आणि शहरी भागात मिळून ८८ नव्या रुग्णांची वाढ झाली असून यामध्ये महापालिका हद्दीतील ६७ तर ग्रामीण भागातील १३ रुग्णांचा समावेश आहे. ७०९७ एकूण बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत या आजारातून बरे होऊन परतणाऱ्याचे प्रमाण निम्मे म्हणजे ३५७१ एवढी आहे. तर सध्या ३२०८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३१८ जणांचा या महामाहीरीने मृत्यू झाला आहे.

एकाच कुटंबात वीस रुग्ण..

दरम्यान, काल शहरातील पदमपुरा भागातील एकाच कुटंबातील २० जणांचा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने या भागात खळबळ उडाली होती. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असूनही हे लोक तपासणीला विरोध करत होते. महापालिकेच्या पथकाने वारंवार जाऊन त्यांना तपासणीसाठी येण्याचे आवाहन केले, पण त्यांनी विरोध केला. शेवटी पोलिसांना पाचारण करून या सगळ्यांना तपासणीसाठी न्यावे लागले होते. अहवाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसला, कारण एकाट कुटुंबातील या वीस सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दोन महिन्यापुर्वी या भागातील एका डॉक्टारला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी एका ८० वर्षाच्या वृध्दाला कोरोनाची लागण झाली, आणि त्यांच्या संपर्कातील आणखी चौघांचे अहवाल देखील पॉझीटीव्ह आले होते. पदमपुरा येथील कमान भाग हा दाट वस्तीचा भाग आहे. इथे मोठे वाडे असल्याने एकाच ठिकाणी राहणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे ज्या चार जणांना कोरोनाची लागण झाली, त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचे स्वॅब तपासण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य पथकाने घेतला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com