विजयाबद्दल विश्वास नसल्यानेच विरोधकांची निवडणुकीतून माघार.. - No Confidence For Victory, Opposition withdraws from polls | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

विजयाबद्दल विश्वास नसल्यानेच विरोधकांची निवडणुकीतून माघार..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 मार्च 2021


जिल्हा बँकेच्या आठ जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. निवडणुकीचा निषेध म्हणत माघारीची घोषणा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली. त्यावर धनंजय मुंडे यांनी टोला लगावला.
 

बीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून मतदानाच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पक्षाने माघार घेतली. असे असली तरी महाविकास आघाडी ही निवडणूक अत्यंत ताकदीने लढणार असून भाजपने आत्मविश्वास गमावल्याचा टोला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ पैकी आठ जागांसाठी निवडणुक होत असून शनिवारी मतदान होणार आहे. मात्र, सत्तेच्या जोरावर सुरळीत चालणाऱ्या आणि भाजप वरचढ असलेल्या संस्थेवर प्रशासक आणण्याचे सत्ताधाऱ्यांचे आणि पालकमंत्र्यांचे कारस्थान असल्याचा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला. तसेच निषेध म्हणून बहिष्काराची घोषणाही केली .

त्यावर धनंजय मुंडे यांच्यासह आघाडीच्या नेत्यांनी पत्रकाद्वारे प्रतिक्रीया दिली आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अर्थ संजीवनी ठरणे आवश्यक आहे; त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या सहा जागा लढवत आहेत. या निवडणुकीला पूर्ण क्षमतेने सामोरे जात असून, पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करून घ्यावे, जिल्हा बँकेतील मागील संचालक मंडळाच्या कारभाराला पाहता एकूण मतदानाच्या ९० टक्के मतदान आघाडीच्या उमेदवारांना मिळेल, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला १०० टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी असे आवाहनही  मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड, माजी आमदार केशव आंधळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदींनी केले.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख