नितीन पाटील शिवसेनेत, जिल्हा बॅंकेवर आता भगवा

शिवसेनेने भाजपला सोबत घेऊन तयार केलेल्या शेतकरी विकास पॅनलला २० पैकी १४ जागा मिळाल्या.
 Udhav Thackeray- Nitin Patil in Shivsena News Aurangabad
Udhav Thackeray- Nitin Patil in Shivsena News Aurangabad

औरंगाबाद ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष, माजी आमदार नितीन पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार व आमदार अंबादास दानवे यांनी भाजपला सोबत घेत शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. नितीन पाटील हे भाजपमध्ये असल्याने त्यांना अध्यक्ष कसे  करायचा असा होता. यावर नितीन पाटील यांनाच शिवसेनेत घेण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष शिवसेनेचा होणार एवढे निश्चित.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेने राज्याच्या सत्तेत असलेल्या काॅंग्रेसला बाजूला सारत विरोधी पक्ष असलेल्या भाजपला सोबत घेतले होते. यावरून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्र्यांना त्रास देणाऱ्या भाजपला सोबत का घेतले? असा सवाल करत खैरे यांनी थेट काॅंग्रेसच्या पॅनलचा प्रचार केला होता.

परंतु शिवसेनेने भाजपला सोबत घेऊन तयार केलेल्या शेतकरी विकास पॅनलला २० पैकी १४ जागा मिळाल्या. निवडणुकी आधी सत्तार, बागडे, भुमरे या पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी नितीन पाटील हेच बॅंकेचे अध्यक्ष असतील असे जाहीर केले होते. निकाल लागला तेव्हा भाजपचे हरिभाऊ बागडे हे पराभूत झाले आणि शिवसेनेने अध्यक्षपद आता निवडून आलेले संचालकच ठरवतील अशी भूमिका घेतली. त्यामुळे सहाजिकच नितीन पाटील बेचैन होते. पण सत्तार-भुमरे या जोडगळीच्या डोक्यात वेगळेच सुरू होते हे आज नितीन पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने स्पष्ट झाले.

सत्तारांची खेळी यशस्वी

जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेकडे असले पाहिजे असा निर्धार या जोडगळीने केला होता. नितीन पाटील यांना अध्यक्ष व्हायचे  असेल तर शिवसेनेत प्रवेश करावा लागेल, अशी गळच सत्तार यांनी घातल्याचे बोलले जाते. त्यानूसार आज नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. हरिभाऊ बागडे यांच्या पराभवाने एक धक्का बसलेल्या भाजपला शिवसेनेने नितीन पाटील यांना शिवबंधन बांधत भाजपला दुसरा धक्का दिला आहे. या निमित्ताने आता जिल्हा बॅंकेवर भगवा फडकला असेच म्हणावे लागेल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नितीन पाटील यांना शिवबंधन बांधण्यात आले तेव्हा पालकमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर यांची उपस्थिती होती.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com