परभणीत लवकरच पाचशे खाटांचे नवे जम्बो कोविड सेंटर

जिल्हा रुग्णालय, आयटीआय इमारत आणि जिल्हा परिषद कोविड रुग्णालय या ठिकाणी एकूण ७०० बेड उपलब्ध आहेत.
Ncp Leader Nawab Malik Meeting In Parbhani News
Ncp Leader Nawab Malik Meeting In Parbhani News

परभणी : कोरोना विषाणु संसर्गामुळे परभणीकर हैराण आहेत. बेड मिळेल की नाही या चिंतेने रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंतेत असतांनाच. त्यांची चिंता मिटविणारी बातमी आहे. परभणी शहरात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर प्रत्येकी ५० खाटांचे कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सुमारे १ हजार नवीन खाटांची व्यवस्था आठ दिवसात केली जाणार आहे.

कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री नवाब मलिक हे गुरुवारी परभणीत आले होते. सकाळी त्यांनी शासकीय रुग्णालय, आयटीआय कोरोना रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार डॉ. राहुल पाटील, मेघना बोर्डीकर, सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात गेल्या महिण्याभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोविड सेंटरमधील खाटांची संख्या वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली. जिल्हा रुग्णालय, आयटीआय इमारत आणि जिल्हा परिषद कोविड रुग्णालय या ठिकाणी एकूण ७०० बेड उपलब्ध आहेत. त्याप्रमाणेच खासगी रुग्णालयामध्ये देखील तेवढेच बेड उपलब्ध आहेत.

परंतू आगामी परिस्थिती पाहता परभणी शहरातील महापालिकेच्या कल्याण मंडप येथे ५०० खाटांचे नवीन जम्बो कोरोना रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या शिवाय  प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० खाटांचे कोरोना सेंटर देखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी एक हजार नवीन बेडची व्यवस्था येत्या आठ ते दहा दिवसांत होणार आहे.

तेराशे ऑक्सीजन सिलिंडरची निर्मिती

ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून ५०० जम्बो ऑक्सिजन सिलेंडर जनरेशनचे दोन प्लांट  जिल्ह्यात उभारण्यात आले आहेत. याचबरोबर आठ तालुक्यांमध्ये मिनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणार आहोत. या माध्यमातून जिल्ह्यात तेराशे जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती केली जाणार आहे.

पाचेशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अर्थात छोटी युनिट खरेदी करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. भिलारी (कर्नाटक) जिल्ह्यातून दररोज २० हजार किलोलिटर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती देखील या बैठकीत देण्यात आली.

याशिवाय बैठकीत आमदार सुरेश वरपडूकर यांनी १४० व्हेंटिलेटर खेरदीचा प्रस्ताव दिला. जिल्हा रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत पालकमंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त करत तातडीने साफसफाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी सोपवण्यात आली असून रुग्ण व नातेवाईकांच्या मदतीसाठी अद्यायावत कॉलसेंटर उभारण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com