खंबीर व धाडसी निर्णयांची हिंमत नरेंद्र मोदींनी दाखवली..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पंतप्रधान पदाच्या वर्षपूर्ती निमित्त त्यांनी घेतलेले निर्णय जिल्हा भाजप बीड जिल्ह्यातील २३११ बुथांपर्यंत पत्राच्या माध्यमातून पोच करणार आहे.
pm modi take disisons news beed
pm modi take disisons news beed

बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम हटवून काश्मिरचा भारतात केलेला समावेश, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदीर उभारणीसाठी ट्रस्टची निर्मिती, शेतकऱ्यांसाठी सरसकट प्रधानमंत्री सन्मान योजना अशा प्रमुख धोरणात्मक निर्णयासह आतापर्यंत घेतलेले निर्णय खरोखरच सबका साथ सबका विकास अशीच आहेत. खंबीर व धाडसी निर्णय घेण्याची हिंमत फक्त नरेंद्र मोदी यांनीच दाखवली, अशा शब्दांत भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी मोदी सरकारच्या वर्षपुर्तीचे गुणगाण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या पंतप्रधान पदाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि पंतप्रधानांचे पत्र वाटप अभियान भाजपने जिल्ह्यात हाती घेतले आहे. जिल्ह्यातील लोकसभेच्या २३११ बुथमध्ये हे अभियान राबविले जाणार असून प्रत्येक बुथ मधील शंभर घरी नरेंद्र मोदी यांचे पत्र पोहचवले जाणार आहे. फिजीकल डिस्टन्सींगसाठी प्रत्येक बुथवर केवळ दोन कार्यकर्ते जाऊन पत्र वाटपासोबतच मास्क आणि सॅनिटायझर देखील वाटप करणार आहेत.

या अभियानाची माहिती मंगळवारी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत देण्यात आली.  डॉ. प्रितम मुंडे यांनीही मुंबईहून पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधत आपला सहभाग नोंदवला.

खासदार मुंडे म्हणाल्या, लाभार्थी व गजरवंतांना थेट खात्यावर मदत करुन दलाली व काळाबाजार बंद करण्याचे निर्णय मोदी यांनी घेतले. कोरोनाच्या काळात जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजमुळे देशात अनेक आवश्यक बाबींचे उत्पादन होऊन परावलंबीताही कमी होण्यास मदत होणार आहे. गरिबांना तीन महिन्यांचे धान्य वाटप, शेतकरी व कामगारांना दिलेला दिलासा असे खंबीर निर्णय घेण्याचे धाडस नरेंद्र मोदी यांनी दाखवले.

पुर्वी केवळ विशिष्ट समाजाला व्होट बँकेसाठी कुरवाळून ठेवले जात होते. मात्र, नरेंद्र मोदींनी खंबीरपणा काय असतो ते दाखवून दिले. शेतकरी, व्यापारी, उद्योजक अशा सर्वच घटकांना त्यांनी दिलासा दिला. कोरोनाच्या महामारीतही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाच्या पाठीवर भारतातील परिस्थिती अटोक्यात असल्याचा दावाही डॉ. प्रितम मुंडे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com