मुंडेंची ताकद, अमरसिंहांचे डावपेच; भाजपला जिल्हा बॅंकेत धक्का देणार?

सत्तेच्या माध्यमातून भाजपने जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर प्रभूत्व निर्माण केले आहे. या माध्यमातून अनेक चुकीच्या लोकांनी बँकेत संचालक मंडळात एंट्रीही केली. अगदीनेतृत्वाच्या मर्जीविरुद्धही बँकेत कारभार झाले. आता राष्ट्रवादीही पहिल्या डावात तरी यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
Beed district Bank- Dhanjay Munde- Pankaja Munde News
Beed district Bank- Dhanjay Munde- Pankaja Munde News

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा असलेल्या सेवा सोसायटी मतदार संघातील सर्वच अर्ज बाद झाले. उमेदवारी अर्ज बाद झालेल्यांमध्ये भाजपसह राष्ट्रवादीच्याही मातब्बरांचा समावेश आहे. आता केवळ उर्वरित सात मतदार संघातील आठ संचालकांच्या निवडीसाठी निवडणुक होईल. मात्र, राष्ट्रवादीने खेळलेला हा पहिला डाव असून राष्ट्रवादीने आखलेले सर्व डावपेच यशस्वी झाले तर जिल्हा बँकेतील भाजपच्या काही मंडळींची मक्तेदारी मोडीत निघण्याची शक्यता आहे.

प्रथमदर्शनी राष्ट्रवादीचा पहिला डाव यशस्वी झाल्याचे दिसत आहे. डावपेचांची आखणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांची आहे. त्याला ताकद पालकमंत्री धनंजय मुंडे यांची आहे. १९९७ पासून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपचे वर्चस्व आहे. भलेही अनेक वेळा विविध पक्षीय आघाड्या झाल्या असल्या किंवा इतर पक्षांचे अध्यक्ष - उपाध्यक्ष झाले असले तरी संचालक मंडळावर प्रभाव भाजपचाच राहीलेला आहे.

नऊ वर्षांपूर्वी संचालक मंडळाच्या राजीनाम्यानंतर बँकेवर प्रशासक नेमल्यानंतर दिडशेंवर गुन्हे नोंद झाले. यात जिल्ह्यातील प्रमुख राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेस नेत्यांचा आरोपींमध्ये समावेश होता. पण, त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असूनही सर्वाधिक त्रास याच मंडळींना झाला. भाजपच्याही काही मंडळींना जेलची हवा खावी लागली. दरम्यान, सहा वर्षांपूर्वी बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाड्यांमध्ये लढत झाली. त्यात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत आली.

दरम्यान, कागदोपत्री संस्थांची नोंदणी करणे, त्यांच्या नावावर बँकेचे कोट्यावधींचे कर्ज
उचलण्याचे प्रकार तर अगोदरच उघड झालेले आहेत. मात्र, बँकेतील सत्तेच्या माध्यमातून अकार्यक्षम किंवा अवसायनातील संस्था कायम राहील्याने मतदार यादीवर भाजपचे प्रभुत्व राहीले. राष्ट्रवादी केवळ सेवा सोसायटी व इतर आठ पैकी एखाद दुसऱ्या मतदार संघातून निवडणुक जिंकत असल्याचा अलिकडच्या काळातील इतिहास आहे. मात्र, दुसरीकडे अगदी भाजपच्या नेतृत्वालाही डोकेदुखी ठरणारे, कधी - कधी नको असणारेही कायम बँकेत एंट्री करतात.

दिग्गजांना धक्का..

वर्षभर कोरोना विषाणू संसर्गाच्या कारणाने लांबलेली बँकेच्या १९ संचालकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. २२ फेब्रुवारी पर्यंत तब्बल २१४ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नेहमीप्रमाणे सेवा सोसायटी मतदार संघातून मातब्बरांचे अर्ज दाखल झाले. पण, मंगळवारी झालेल्या छाणनीत सेवा सोसायटीच्या ११ तालुका मतदार संघातील सर्वच ८७ अर्ज बाद झाले.

यामध्ये भाजपचे जेष्ठ नेते रमेश आडसकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, ऋषीकेश आडसकर, आमदार सुरेश धसांचे चिरंजीव जयदत्त धस अशा भाजप - राष्ट्रवादीच्या मातब्बरांचे अर्जही बाद झाले. मात्र, राष्ट्रवादीने खेळलेला हा पहिला डाव सुरुवातीला भाजपच्याही लक्षात आला नाही. ज्या सोसायटीतून उमेदवारी दाखल झाली त्या सोसायटीला सलग तीन वर्षे लेखा परीक्षणाचा अ किंवा ब दर्जा असावा अशी बँकेच्याच उपविधीत तरतुद आहे.

मात्र, उमेदवारांना तशी एकही सोसायटी न मिळाल्याने सर्वच अर्ज निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी नामंजूर केले. मात्र, मागच्या वेळी राज्यात भाजपची सत्ता असल्याने या उपविधिच्या तरतुदीला राज्य सरकारची स्थगिती मिळविली होती. यावेळी औरंगाबाद बँकेच्या या उपविधी नियमालाही स्थगिती मिळाली आहे. बीडमध्येही स्थगितीचे अपिल केल्याचे चित्र उभा केले पण ही स्थगिती राष्ट्रवादीलाच नको होती हे आता स्पष्ट झाले आहे.

कारण, आता सोसायटीमधून निवडले जाणारे ११ संचालकपदे रिक्त राहू शकतात. तर, निवडणुक होणाऱ्या सात मतदार संघातील आठ संचालकांमधूनही राष्ट्रवादी काही जागा जिंकू शकते. मग, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी संचालकांच्या उपस्थितीचा कोरम पूर्ण होणार नाही. तसा अहवाल निवडणुक प्राधिकरणामार्फत शासनास जाईल व बँकेवर प्रशासकांची नेमणूक होऊ शकते. या काळात भाजपचे प्रभुत्व असलेली मतदार यादी पुन्हा फेर होऊ शकते आणि त्यातील अकार्यक्षम, अवसायनात निघालेल्या संस्थांची नावे वगळली जाऊ शकतात.

सेवा सोसायटींच्या मतदार याद्यांतही काही बदल होऊन याही मतदार संघातून राष्ट्रवादीचे अपेक्षेपेक्षा एखाद दुसरा संचालक वाढेल असा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. एकूणच भाजपचे प्रभुत्व रद्द करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने डाव टाकण्यास सुरुवात केली असून प्रथमदर्शनही पहिला डाव तर यशस्वी झाल्याचे दिसत आहे. या खेळीतील डावपेच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचे असून त्याला ताकद पालकमंत्री धनंजय मुंडे यांची असल्याचे स्पष्ट आहे. श्री. पंडित यांनी यापूर्वी दोन वेळा बँकेचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. त्यांच्या शिवछत्रवरुनही सुत्रे हालली आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com