बीड जिल्हा बॅंक : मुंडे, पंडितांचे डावपेच यशस्वी; सोळंकेंचाही हिशोब चुकता - Munde and Pandit have success in beed district bank result | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

इंदापूरला उजनीतून पाणी देण्याचा निर्णय रद्द : जयंत पाटील यांची घोषणा
मंत्रीमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सह्याद्रीवर दाखल. एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे हेही उपस्थित आहेत.
मराठा आरक्षणासाठीची भाजपची महत्वाची बैठक आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी होत आहे. यासाठी रविंद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, प्रवीण दरेकर उपस्थित आहेत.

बीड जिल्हा बॅंक : मुंडे, पंडितांचे डावपेच यशस्वी; सोळंकेंचाही हिशोब चुकता

दत्ता देशमुख
रविवार, 21 मार्च 2021

राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास आघाडीला पाच तर बहिष्कार टाकलेल्या भाजप व अलिप्त शिवसेनेचाही एक संचालक विजयी झाला. काँग्रेसनेही घवघवित यश मिळवित आघाडीतून एक आणि एक अपक्ष जागा जिंकली.

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे फासे सवासे पडत आहेत. १९ पैकी आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास आघाडीने पाच जागा जिंकल्या असून निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या भाजप व अलिप्त राहीलेल्या शिवसेनेलाही एक जागा मिळाली आहे.

निवडणुक रिंगणातील एकमेव शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांचा दारुण पराभव झाला आहे. तर, आघाडीत नागरी बँक/पगारदार पतसंस्था मतदार संघातील आमदार प्रकाश सोळंके समर्थक उमेदवार गंगाधर आगे यांचाही दारुण पराभव झाला आहे. मागच्या निवडणुकीत सोळंके गटाने राष्ट्रवादी उमेदवाराच्या पराभवाला केलेल्या मदतीचा हिशोब पंडितांनी या निवडणुकीत चुकता केल्याचे मानले जाते.

आघाडीतून काँग्रेसच्या राष्ट्रीय अनुसुचित जाती विभागाचे रविंद्र दळवी अनुसुचित जाती जमाती मतदार संघातून विजयी झाले. तर, नागरी बँक/पगारदार पतसंस्था मतदार संघातून अपक्ष रिंगणात असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदींनीही विजय मिळविला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडीसाठी प्रक्रीया सुरु झाली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांची राजकीय ताकद आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचे डावपेच या समिकरणाने राष्ट्रवादी रिंगणात उतरली. याच डावपेचाचा भाग म्हणजे पहिल्यांदा सेवा सोसायटी मतदार संघातील सर्व उमेदवारांचे अर्ज रद्द होणे आणि या मतदारसंघाची निवडणूक रद्द होणे हा भाग आहे.  सेवा संस्था मतदार संघातून उमेदवारांचे ठराव देणाऱ्या सेवा सोसायट्यांना मागच्या तीन वर्षांत लेखा परीक्षणाचा अ किंवा ब दर्जा असावा अशी बँकेच्या उपविधीत तरतूद आहे. मात्र, तो दर्जा नसल्याने या मतदार संघातील सर्वच उमेदवाऱ्या बाद झाल्या.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात विभागीय सहनिबंधक, सहकार मंत्री, उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ व सर्वोच्च न्यायालयांपर्यंत दाद मागूनही दिलासा न मिळाल्याने या मतदारसंघांची निवडणुकच रद्द झाली. दरम्यान, उर्वरित सात मतदार संघातील आठ जागांसाठी झालेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचा शेतकरी विकास पॅनल रिंगाणत उतरला पण शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक वेगळ्या चिन्हांवर होते. तर, शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित देखील या आघाडीत नव्हते.

मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी निवडणुक प्रक्रीयेचा निषेध म्हणून बहिष्कार अस्त्र उगारले. त्यामुळे शिवसेनेचा दुसरा गटही गर्भगळीत झाला आणि त्यांनीही अलिप्त म्हणत शस्त्र म्यान केले. त्यामुळे बदामराव पंडित यांचा मोठा पराभव झाला. दरम्यान, राष्ट्रवादी आघाडीने आठ पैकी पाच जागा मिळविल्या. तर, बहिष्कार टाकलेल्या भाजपला व शिवसेनेलाही प्रत्येकी एकेक जागा मिळाली. विशेष म्हणजे आघाडीतून रविंद्र दळवी आणि अपक्ष राजकिशोर मोदी अशा दोघांनी संचालक मंडळात प्रवेश केला आहे. सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे देखील विजयी झाले आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या राजकीशोर मोदी यांना आघाडीत घेण्यास आमदार प्रकाश सोळंके यांनी विरोध केला. त्यांनी समर्थक गंगाधर आगे यांना रिंगणात उतरविले. मात्र, आगेंचाही मोठ्या फरकाने पराभव झाला. मागच्या निवडणुकीत सोळंके गटाने भाजपच्या सारडांना रसद पुरविल्याने त्यावेळी अमरसिंह पंडित समर्थक उमेदवाराचा पराभव झाला होता. आता या निमित्ताने तोही सोळंकेकडील हिशोब पंडितांनी चुकता केल्याचे बोलले जाते. दरम्यान, कोरम पूर्ण होणार नसल्याने संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासकांची नेमणूक होईल, असे मानले जाते. त्यादृष्टीनेच राष्ट्रवादी फासे आवळत असल्याचे मानले जाते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख