मुनगंटीवार म्हणाले, देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावेच लागेल..

आमच्या सरकारवर कर्जबाजारीपणावरून टीका केली जायचीफडणवीस सरकार कर्जबाजारी आहे. मग तुमच्या काळात राज्यावरील कर्जाचा डोंगर का वाढला
Assembly Session News-Devendra Fadnvis- Sudhir Mungantiwar News
Assembly Session News-Devendra Fadnvis- Sudhir Mungantiwar News

औरंगाबाद : हे राज्य डबघाईला चालले आहे, या राज्याला वाचवण्यासाठी देवेंद्रजी तुम्हाला पुन्हा यावेच लागेल, असे म्हणतानाच फक्त तीन महिने, त्यानंतर आम्ही येणारच असा दावा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनंगटीवार यांनी सभागृहात केला. अजित पवार तुमच्यावर टीका करावी की नाही, असे म्हणत पुन्हा तुम्ही कधी आमच्या सोबत आलात तर? असा चिमटाही त्यांनी काढला.

अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. केंद्राकडे बोट दाखवण्याचे धोरण, नुसत्या घोषणा तरतुदीचा पत्ता नाही, कोरोना काळातही प्रसिद्धीसाठी अडीचशे कोटींची केलेली तरतूद यासह विविध मुद्यावर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेलाही हिंदुत्व, शिवभोजन थाळी यावरून मुनगंटीवार यांनी खडेबोल सुनावले.

मुनगंटीवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारने या महाराष्ट्राला मेट्रो, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई एअरपोर्ट, ट्रान्सहर्बर लिंक सारखे हजारो कोटींचे प्रकल्प दिले. पण महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी तरतूदच दिसत नाही. हे प्रकल्प तुम्हाला बंद पाडायचे आहेत का? तुमच्या अर्थसंकल्पातून आत्मविश्वासच दिसत नाही.

आमच्या सरकारवर कर्जबाजारीपणावरून टीका केली जायची. फडणवीस सरकार कर्जबाजारी आहे, मग तुमच्या काळात राज्यावरील कर्जाचा डोंगर का वाढला? आमच्या काळात १६ टक्के असलेले कर्ज आज २०.६ टक्क्यावर कसे गेल? राज्यातील शहीद पोलीस, माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांच्यासाठी आपुलकी आणि कणव दाखवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने समोर आला आहे.

शहीद पोलीसांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी १ लाखाची तरतूद, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी दहा हजार, तर माजी सैनिकांसाठी फक्त दोन लाख रूपये. एवढे पुतणा मावशीचे प्रेम दाखवू नका ती देखील पळून जाईल, असा टोला देखील मुनगंटीवार यांनी लगावला. कोरोनामुळे राज्य आर्थिक संकटात आहे, केंद्राकडून पैसा मिळाला नाही हे सरकारकडून वारंवार सांगितले जाते. घरात मीठाला पैसे नसतील तर कुणी गोड खाईल का? असा सवाल करत फडणवीस सरकारच्या काळात प्रसिद्धीवर झालेला खर्च आणि आघाडी सरकारने केलेली तरतूद याची आकडेवारीच मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडली.

बारामतीकरांनी गरीबांचा विचारच केला नाही

आमचे सरकार प्रसिद्धीला हपापलेले आहे, असा आरोप केला जायचा. किती खर्च केला होता आम्ही २०१६-१७ मध्ये २६ कोटी तर १९-२० मध्ये निवडणूका असल्यामुळे १२५ कोटी. तुम्ही तर दीड वर्षात २४६ कोटींची तरतूद प्रसिद्धीसाठी केली आहे. मग तुम्हाला प्रसिद्धीचा एवढा हव्यास कशाला हो? अशी विचारणाही मुनगंटीवार यांनी केली. राज्यातील शेतकरी, निराधार, सुशिक्षित बेरोजगार, महिला यांना कवडीचीही मदत अर्थसंकल्पात तुम्ही केली नाही.

वचननामा, जाहीरनामा यात तर मोठ्या गोष्टी सांगितल्या होत्या, हाच का तुमचा वचननामा? उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के दराने कर्ज देऊ असे सांगितले होते, पण उच्च शिक्षणासाठी कर्जच मिळत नाही ही अवस्था आहे. बारामतीकरांनी अर्थसंकल्पात गरीबांचा विचारच केला नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून केला.

१६१ आमदार असतांना आपण गाफील राहिलो, तेव्हा तुम्ही मेगाभरती सुरू केली होती. देवेंद्रजी आता पुन्हा मेगाभरती करा, आता मंत्र्यांची मेगाभरती अशी जाहिरात करा, सुनील केदार याचा लाभ घ्या, असा चिमटा काढत भाषणाच्या शेवटी जनतेची होतेयं परवड, सरकार खेळतंय धुरवड अशी कविता सादर करत मुनगंटीवार यांनी आपले भाषण संपवले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com