Mr. Guardian Minister, the administration is running arbitrarily, hold a meeting | Sarkarnama

पालकमंत्री महोदय प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे, बैठक घ्या..

तानाजी जाधवर
मंगळवार, 14 जुलै 2020

प्रशासनाचा लोकप्रतिनिधीशी कुठल्याही प्रकारचा समन्वय किंवा संवाद नाही. विश्वासात न घेता प्रशासन मनमानीप्रमाणे कारभार करत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. यामुळे प्रशासनावर नियंत्रण कोणाचे हा प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन रुग्णाची संख्या ४१८ वर पोहचली आहे.

उस्मानाबाद ः जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे, रुग्णांची संख्या आणि मृतांचे प्रमाण चिंतादायक आहे. अशावेळी जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णय घेणे अपेक्षित आहे. पण सध्या प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप भाजपचे सरचिटणीस तथा आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी केला आहे. पालकमंत्री शंकरराव गडाख यांना पत्र पाठवून तातडीने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व प्रशासनाची एकत्रित बैठक घेण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थीती प्रशासनाच्या हाताबाहेर चालली आहे. दिवसेंदिवस रुग्णाची संख्या व मृतांचा आकडा वाढतच असल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये पहिला लॉकडाऊन सूरु झाल्यापासुन आजतागायत एकदाही लोकप्रतिनिधीं सोबत प्रशासनाला बैठक घ्यावी वाटली नाही, याचे आश्चर्य वाटते. लोकप्रतिनिधी स्वतः हुन सामाजिक दायित्वाच्या जाणीवेतुन प्रशासनाला सहकार्याची भुमिका घेऊन कार्यरत आहेत.

पण प्रशासनाचा लोकप्रतिनिधीशी कुठल्याही प्रकारचा समन्वय किंवा संवाद नाही. विश्वासात न घेता प्रशासन मनमानीप्रमाणे कारभार करत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे. यामुळे प्रशासनावर नियंत्रण कोणाचे हा प्रश्न उपस्थित होतो. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असुन रुग्णाची संख्या ४१८ वर पोहचली आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत कोवीडसाठी खर्चास मान्यता दिलेला निधी खर्च, शेतकऱ्यांशी निगडीत प्रश्न, निधीची उपलब्धता, खर्च यासह विविध प्रश्नांवर चर्चा होऊन कामे मार्गी लागली पाहिजेत. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

दरम्यान, पालकमंत्री शंकरराव गडाख हे दोन महिन्यांपासून जिल्ह्यात फिरकलेच नाहीत, याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोना सारखे संकट उभे ठाकले असतांना पालकमंत्र्यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडला आहे का? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये तिथले पालकमंत्री नियमित जिल्ह्यांचे दौरे करून कोरोनाचा आढावा घेऊन उपाययोजना करत आहेत.

उस्मनाबादेत मात्र नेमके या उलट चित्र असून प्रशासन गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे त्यांच्या वारंवार आपलेच आदेश बदलण्यावरून स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी एकत्रित बैठक घेण्याचा मागणीला पालकमंत्री गडाख कसा आणि कधी प्रतिसाद देतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By: Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख