खासदारांचा आधी पुढाकार, आता बहिष्कार..

‘मी या जिल्ह्याचा खासदार आहे, मी कुठेही जाऊन लोकांना सागू शकतो‘, असे म्हणत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या ‘ तुमच्या एरियात आम्हाला तुमची मदत लागेल', या विधानाचा समाचार घेणारे खासदार इम्तियाज जलील आज झालेल्या लोकप्रतिनिधी-प्रशासनाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
imtiaz jalil boycott news
imtiaz jalil boycott news

औरंगाबादः शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र यायला पाहिजे अशी भूमिका घेत पुढाकार घेणारे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आजच्या महत्वाच्या बैठकीवर मात्र बहिष्कार टाकल्याचे दिसून आले.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दगावणाऱ्यांचे प्रमाण पाहता शहरात पुन्हा लॉकडाऊन करावा का? यावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या संयुक्त बैठकीला इम्तियाज जलील यांनी दांडी मारली. आतापर्यंत एकही बैठक न चुकवणाऱ्या इम्तियाज यांना नेमका कशाचा राग आला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

‘मी या जिल्ह्याचा खासदार आहे, मी कुठेही जाऊन लोकांना सागू शकतो‘, असे म्हणत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या ‘ तुमच्या एरियात आम्हाला तुमची मदत लागेल', या विधानाचा समाचार घेणारे खासदार इम्तियाज जलील आज झालेल्या लोकप्रतिनिधी-प्रशासनाच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

रात्रीच्या लॉकडाऊनने काही साध्य होणार नाही, उलट आता योग्य काळजी घेऊन दैनंदिन व्यवहार सुरू राहिले पाहिजे, अशी भूमिका घेत इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनचा निर्णय पुन्हा घेऊ नये, असे मत व्यक्त केले होते.अगदी प्रशासनाच्या हालचाली पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या दिशेने सुरू असल्याचे समजताच इम्तियाज जलील यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला होता.

लॉकडाऊनला आपला विरोध असल्याचे इम्तियाज यांनी आधीच स्पष्ट केले होते. पण प्रशासन आणि इतर लोकप्रतिनिधी लॉकडाऊनचा निर्णय बैठकीत घेणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे इम्तियाज यांनी या बैठकीकडेच पाठ फिरवली. शहरातील व्यापारी संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची भेट घेऊन दोन महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आधीच खूप नुकसान झाले आहे, अर्थव्यवस्था, उद्योग पुन्हा रुळावर आणतांना नाकीनऊ येत असतांना पुन्हा लॉकडाऊन नको, अशी मागणी निवेदनाद्वारे या मंडळीनी खासदारांकडे केली होती.

परंतु शहरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज दोनशे पेक्षा अधिकने वाढत असल्यामुळे नागरिकांमधून कडक लॉकडाऊनची मागणी जोर धरू लागली होती. कोरोना रुग्ण आणि मृतांची वाढती संख्या याला नियोजनशून्य प्रशासन जबादार असल्याची टिका देखील सर्व स्तरातून होत असल्याने, प्रशासन देखील पुन्हा लॉकडाऊन करण्याचा मनस्थितीत होते. त्यांना इतर लोकप्रतिनिधींची देखील साथ मिळाली, आणि आजच्या बैठकीत १० ते १८ जुलै दरम्यान, कडक जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्पापाऱ्यांचा पाठिंबा..

विशेष म्हणजे व्यापारी व उद्योजकांच्या ज्या शिष्टमंडळाने लॉकडाऊन नको, अशी भूमिका घेत खासदारांना घरी जाऊन निवेदन दिले होते, ते देखील आजच्या बैठकीत हजर होते. त्यांनीही लॉकडाऊनच्या निर्णयला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे आपल्या भूमिकेला बैठकीत विरोध होणार याची जाणीव इम्तियाज जलील यांना झाली. एकट्याच्या विरोधाने काहीही साध्य होणार नाही, हे लक्षात आल्यावर इम्तियाज जलील यांनी या बैठकीलाच जाण्याचे टाळले आणि या निर्णयापासून स्वतःला दूर ठेवल्याचे दिसून आले.

सायंकाळपर्यंत त्यांनी कुणाचेही फोन घेतले, नाही की लॉकडाऊनच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली नाही. एकंदरित आपला लॉकडाऊनला विरोध असतांना प्रशासन आणि इतर राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधीनी शहरात पुन्हा लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याने इम्तियाज जलील कमालीचे नाराज असल्याचे त्यांच्या अनुपस्थितीवरून स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com