खासदार जाधव म्हणाले, शिवसेनाही स्वबळावर लढणार..

काॅंग्रेस-राष्ट्रवादीची युती होईल की नाही हेच सांगता येत नाही, तिथे तीन पक्ष एकत्रित निवडणूका लढवतील का?
खासदार जाधव म्हणाले, शिवसेनाही स्वबळावर लढणार..
Shivsena Mp Sanjay jadhav- Ncp Clash News Parbhani

परभणी ः राष्ट्रवादीला कधीही बुडवू असा दम भरल्यानंतर शिवसेना खासदार संजय जाधव यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार असे सांगत तयारीला लागा, अशा सूचना शिवसैनिकांना दिल्या आहेत. (MP Jadhav said, Shiv Sena will also fight on its own) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी काॅंग्रेस-राष्ट्रवादीचीच युती होईना, मग तीन पक्षांची कशी होईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

घनसांवगी येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात खासदार जाधव चांगलेच आक्रमक झाले होते. परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली रोखण्यात आलेले अपयश, मतदारसंघात राष्ट्रवादीकडून होणार उपद्रव आणि त्याला सडेतोड उत्तर देण्याची भाषा करत त्यांनी स्वबळाची घोषणाही परस्पर करून टाकली. (Shivsena Mp Sanjay Jadhav, Parbhani) काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात सर्वप्रथम स्वबळाची घोषणा केली.

त्यानंतरही शिवसेना व राष्ट्रवादी यांनी मात्र आम्ही मात्र येणाऱ्या सगळ्या निवडणूका एकत्रच लढणार असे जाहीर केले होते. त्यानंतर मात्र प्रत्येक पक्षाला आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याचा अधिकार आहे म्हणत मेळावे आणि संवाद यात्रा सुरु केल्या होत्या. परभणी लोकसभा मतदारसंघातील घनसावंगीत रविवारी झालेल्या शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात खासदार जाधव यांनी देखील स्वबळाचा नारा दिला.

राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून कसा त्रास दिला जातो हे सांगताना त्यांनी सहन करण्याची काही मर्यादा असते, आम्ही तुम्हाला कधीही बुडवू शकतो, असा दम देखील भरला. याचवेळी त्यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आतापासूनच सुरू करा, असे आवाहन उपस्थितांना केले.

काॅंग्रेस-राष्ट्रवादीची युती होईल की नाही हेच सांगता येत नाही, तिथे तीन पक्ष एकत्रित निवडणूका लढवतील का? तेव्हा स्वबळावर लढू निवडूण आल्यावर काय करायचे, करायचे की नाही हे ठरवू, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. गाव तिथे शिवसेना शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील किमान शंभर शिवसैनिकांची अद्यावत मोबाईल क्रमांकासह यादी तयार करा, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare


 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in