मोदी सरकारने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला

संघराज्य व्यवस्थेत राज्यांतर्गत त्यांना न्याय देण्याचा अधिकार होता पण आता ही संघराज्य व्यवस्था मोदी सरकारला मान्य नाही. सर्व अधिकार केंद्राने आपल्या ताब्यात घ्यायचा हा मानस आहे जो निषेधार्ह आहे.
Congress Leader Schin Sawant- Maratha Reservation News
Congress Leader Schin Sawant- Maratha Reservation News

मुंबई ः मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. १०२ व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे व राज्यांना आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकारच राहिला नाही असे म्हणून मोदी सरकारने मराठा समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत यांनी केला.

अॅटर्नी जनरलच्या या भूमिकेतून मोदी सरकार हे आरक्षण विरोधी असून संविधानातील संघराज्य व्यवस्था त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट झाल्याची टीकाही यांनी केली.

यासंदर्भात सावंत म्हणाले,  मराठा आरक्षण प्रश्नी भाजपाचा रंगराग अगोदरच दिसला होता, ज्यावेळी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद हे राज्य सरकारच्या बैठकीला अनुपस्थित राहिले होते. अॅटर्नी जनरलनेही राज्याच्या वकीलांना भेट नाकारली होती. यातूनच राज्य सरकारला सहकार्य करायचे नाही हीच भूमिका भाजपाची होती. १०२ व्या घटना दुरूस्ती मागील मोदी सरकारचे अंतरंगही आता स्पष्ट झाले.

सामाजिक आणि आर्थिक मागास जातींना संविधानातील तरतूदीनुसार न्याय देण्यासाठी मागासवर्गीय आयोग नेमून कायदा करण्याचा राज्यांचा अधिकारच केंद्र सरकारने काढून घेतला आहे हे स्पष्ट झाले आहे. राज्याराज्यांत वेगवेगळ्या जाती असून त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. संघराज्य व्यवस्थेत राज्यांतर्गत त्यांना न्याय देण्याचा अधिकार होता पण आता ही संघराज्य व्यवस्था मोदी सरकारला मान्य नाही.

सर्व अधिकार केंद्राने आपल्या ताब्यात घ्यायचा हा मानस आहे जो निषेधार्ह आहे. यातून भविष्यातील आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक छोट्या छोट्या समाजांना प्रचंड अडथळा निर्माण केला गेला आहे. केंद्र सरकारची आडमुठी भूमिका असतानाही महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले आहेत.

मराठा आरक्षणात भाजपचाच खोडा..

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी लढणाऱ्या सर्व राज्यांना नोटीस काढली असून इंदिरा सहानी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी मोठ्या घटनापीठाकडे सोपविण्याबाबत विचार केला जाईल. महाविकास आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करताे, असे म्हणत सचिन सावंत यांनी केंद्र सरकारचा मराठा आरक्षणाशी काही संबंध नाही असे म्हणणाऱ्या भाजपाचा जाहीर निषेधही केला.

मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे पण केंद्रातील भाजपा सरकार त्यात खोडा घालत आहे. मोदी सरकारच्या या महाराष्ट्र विरोधी भूमिकेवर राज्यातील भाजपा नेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जनतेने जाब विचारला पाहिजे, असेही सावंत म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com