मोदी सरकारने देशातील कामगारांचा पगार तिजोरीतून करावा.. - The Modi government should pay the salaries of the workers of the country from the coffers. | Politics Marathi News - Sarkarnama

मोदी सरकारने देशातील कामगारांचा पगार तिजोरीतून करावा..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

भाजपच्या सोशल मिडीयावरील लॉबीने मंदिरातील सोने असा शब्द वापरून मला बदनाम केले, असा आरोप चव्हाण यांनी केला. सोने वापरण्याची संकल्पना नवी नाही. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संस्थामधील सोन्याचा उपयोग करून कर्ज उभारले होते.

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज फसवे असून, यातील फक्त दोन लाख कोटी रुपये थेट खर्च केले जाणार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस नेते पृथ्वीरा चव्हाण यांनी केला आहे. तसेच जगभरातील देशांनी कामगारांचे वेतन सरकारी तिजोरीतून केले, त्याप्रमाणे केंद्र शासनाने देखील देशातील कामगारांचे वेतन तिजोरीतून करावे, व केंद्र, राज्य सरकारने मिनी अंदाजपत्रक जाहीर करावे, अशी मागणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी ॲपव्दारे पत्रकारांशी सोमवारी संवाद साधला. कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजसह विविध मुद्यांवर चव्हाण यांनी आपली मते मांडली. चव्हाण म्हणाले, लॉकाडाऊननंतर जीव वाचवायचे की रोजगार वाढवायचा? या विवंचनेत सरकार आहे. जोपर्यंत लस मिळणार नाही, तोपर्यंत कोरोनासोबतच जगावे लागणार आहे. लस उपलब्ध होण्यासाठी दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो.

गेल्या दोन महिन्यात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या मजूरांना आपण त्यांच्या घरी पाठवू शकलो नाही, मजूरांना घरी पाठविण्याची कोणी व्यवस्था करायची? रेल्वेचे भाडे कोण देणार? यावर वाद झाला. मजुरांचे काय हाल झाले हे लज्जास्पद चित्र संपूर्ण जगाने पाहिले. अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक पाऊल पडेल का? अर्थव्यवस्था कधी रुळावर येईल माहित नाही अशी परिस्थीती आहे. पुढे कसा खर्च केला जाणार याबद्दलही ठोस धोरण नाही. यासाठी केंद्र व राज्य सरकारने जूनमध्ये भविष्यातील खर्चाचे मिनी अंदाजपत्रक जाहीर करावे, अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली.

फक्त दोन लाख कोटींचा थेट खर्च

केंद्र शासनाने जाहीर केलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज फसवे आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. २० लाख कोटीपैकी फक्त दोन लाख कोटी रुपयेच थेट मदत होणार आहे, इतर पैसे मात्र फक्त कर्ज रूपाने मिळणार आहेत. मोठमोठी नावे वापरून शुद्ध फसवणूक करण्यात आली आहे.

उद्योजक संघटना मात्र यावर बोलण्यास तयार नाहीत, त्या दहशतीखाली आहेत. किमान या संघटनांनी केंद्र शासनाला सल्ला तरी द्यावा, असे आवाहन करतांनाच जगातील देशांनी कामगारांचे वेतन थेट तिजोरीतून केले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने देखील देशातील कामगारांचे वेतन करावे याचा पुनरुच्चार चव्हाण यांनी केला.

धार्मिक संस्थांचे सोने वापरून पैसे उभारण्यासंदर्भात मी केंद्राला सल्ला दिला, पण भाजपच्या सोशल मिडीयावरील लॉबीने मंदिरातील सोने असा शब्द वापरून मला बदनाम केले, असा आरोप चव्हाण यांनी केला. सोने वापरण्याची संकल्पना नवी नाही. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संस्थामधील सोन्याचा उपयोग करून कर्ज उभारले होते, असा दावाही चव्हाण यांनी केला.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख