‘राज रोजगार'च्या माध्यमातून मनसे देणार तरुणांच्या हाताला काम..

कुठलेही काम करण्याची ज्यांना इच्छा आहे अशा तरुणांना नोकरी मिळवून देण्याकरिता औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे राज रोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे.स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळावे असा यामागचा उद्देश असून जास्तीत जास्त तरुणांनी अर्ज भरून देण्याचे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
raj rojgar yojna news aurangabad
raj rojgar yojna news aurangabad

औरंगाबादः राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतांना पुढे काय? याची चिंता सगळ्यांनाच सतावती आहे. परराज्यातील लाखो कामगार, मजुर मुंबई आणि महाराष्ट्र सोडून आपापल्या राज्यात निघून गेले आहेत. त्यामुळे नव्याने जेव्हा उद्योग, व्यवसाय सुरू होतील तेव्हा मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्यांची गरज पडणार आहे. हे ओळखूनच भूमिपूत्रांना पहिले प्राधान्य हे धोरण ठेवून वाटचाल करणाऱ्या मनसेच्या औरंगाबाद शाखेने राज रोजगार हा उपक्रम सुरू केला आहे.

या माध्यमातून कुठलेही काम करण्याची तयारी असलेल्या तरुणांनी मनसेशी संपर्क साधून अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर व इतर त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आकारास आली असून प्रत्यक्ष आॅनलाईन अर्ज देखील मागवण्यात येत आहेत. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांवर आदळणारे परप्रांतियाचे लोंढे आणि त्यामुळे स्थानिक, भूमीपूत्रांचा हिरावून घेतला जाणारा रोजगार हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रमुख मुद्दा राहिला आहे. मनसेने या विरोधात राज्यामध्ये अनेक आंदोलने देखील केली होती.

मग ते रेल्वे भरती परीक्षेचे आंदोलन असो की, खाजगी उद्योगांमधील नोकरभरतीचा प्रश्न, यावर मनसेने आक्रमक भूमिक घेतली होती. आजही मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठी माणून आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नाववर ठाम आहेत. राज्यावर कोरोनाचे संकट ओढावले आणि त्याने जगभरातील सर्वच राष्ट्रांना एक धडा दिला. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका अधिक वाढल्यानंतर परप्रांतीयांचे लोंढे माघारी परतले आहेत.

ही संधी साधत मराठी आणि स्थानिक तरुणांनी आता मिळेल ते काम करण्याची तयारी दर्शवावी आणि मनसेच्या राज रोजगार उपक्रमात आपले नाव नोंदवावे असे आवाहन औरंगाबाद मनसेच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर औरंगाबाद मधील अनेक कंपन्यातील परप्रांतीय मजुर आपापल्या गावी गेलेले आहेत. त्यामुळे उद्या जेव्हा लॉकडाऊन शिथील होऊन उद्योग सुरू होतील, तेव्हा मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे.

कुठलेही काम करण्याची ज्यांना इच्छा आहे अशा तरुणांना नोकरी मिळवून देण्याकरिता औरंगाबाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे राज रोजगार उपक्रम राबविण्यात येत आहे. स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळावे असा यामागचा उद्देश असून जास्तीत जास्त तरुणांनी अर्ज भरून देण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष सुमित खांबेकर, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, विध्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष राजू जावळीकर, विध्यार्थी सेना शहर अध्यक्ष मंगेश साळवे यांनी केले आहे. 

आधी शिवउद्योग, आता राज रोजगार..

राज्यात १९९५ ते ९९ च्या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा राज ठाकरे यांनी राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी शिव उद्योग हा उपक्रम राज्यात सुरू केला होता. या माध्यमातून राज्यातील हजारो तरुणांच्या हाताला त्या काळात काम देण्याचे काम झाले. पुढे कलांतराने शिव उद्योगचा उपक्रम बंद पडला.

आता २०-२२ वर्षानंतर राज ठाकरे यांच्या पक्षाकडूनच तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी त्यांच्या नावाने एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरूवातीला औरंगाबाद जिल्ह्यात राज रोजगार योजना राबवली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने मराठवाडा व राज्यातील इतर शहरांमध्ये देखील योजनेचा विस्‍तार करण्यात येणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com