आमदार प्रशांत बंब आणि पोलिस अधिकाऱ्यांत हमरीतुमरी - MLA Prashant Bam and police officer Clashes | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार प्रशांत बंब आणि पोलिस अधिकाऱ्यांत हमरीतुमरी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

औरंगपुरा येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी एका तरूणाला थांबवले आणि संचारबंदीमध्ये बाहेर का फिरतोस असे विचारले.

औरंगाबाद ः भाजपचे आमदार प्रशांत बंब यांची आज संचारबंदी दरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याशी वादावादी झाली. कोरोना रुग्णासाठी पाण्याची बाटली आणि बिस्कीट घेऊन जात असल्याचे सांगितल्यावरही पोलिसांनी एका तरूणाला अडवले होते. बंब यांच्या मतदारसंघातील हा तरूण असल्याने बंब यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिस अधिकाऱ्याला जाब विचारला. यावरून दोघांमध्ये बरीच वादावादी झाली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्ण संख्या आणि दगावणाऱ्यांचे प्रमाण पाहता संपुर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात  आली आहे. परंतु खोटी कारणे सांगून लोक अजूनही बाहेर पडत असल्याने पोलिसांनी आता कठोर भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.

औरंगपुरा येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी एका तरूणाला थांबवले आणि संचारबंदीमध्ये बाहेर का फिरतोस असे विचारले. यावर माझे नातेवाई कोरोनाग्रस्त असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सूरू आहेत. त्यांना बिस्कीट आणि पाणी नेऊन देण्यासाठी जात असल्याचे सदर तरूणाने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र पोलिसांना खात्री पटत नसल्याने त्यांनी या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्याची तयारी सुरू केली.

अखेर सदर तरुणाने आमदार प्रशांत बंब यांच्याशी संपर्क साधत त्यांना घडलेला प्रकार सांगितला. बंब यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना फोनवरूनच सदर तरूण खरं सांगतोय,त्याला जाऊ द्या, अशी विनंती केली. पण पोलिसांचे समाधान झाले नाही. पोलिस अधिकारी ऐकत नाही म्हटल्यावर शहरातच असलेले आमदार बंब काही वेळातच औरंगुपरा भागात घटनास्थळी पोहचले.

तरुणाने हाॅस्पीटलमध्ये जात असल्याचे सांगितल्यावरही त्याला का रोखले? याचा जाब ते संबंधित पोलिस अधिकाऱ्याला विचारत होते. यावेळी संचारबंदी आहे, तरुणाकडे रुग्ण अॅडमीट असल्याचे कोणतेही कागदपत्र नाहीत असे म्हणत  पोलिस अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम होते.

बंब यांचा पारा चढला..

पोलिस ऐकत नसल्यामुळे बंब यांचा पारा चांगलाच चढला होता. लोक मरतायेत, व्हेंटिलेटर नाही, आॅक्सिजन नाही, सगळीकडे भयानक परिस्थिती आहे, तरीही पोलिस रुग्णांच्या नातेवाईकांशी असे कसे वागू शकता? असा सवाल त्यांनी केला. सदर तरुण खरंच आपल्या नातेवाईकाला पाणी आणि बिस्कीट द्यायला जात आहे, तो सांगतोय, त्याच्यावर विश्वास ठेवा, किंवा शहानिशा करा, असे म्हणत बंब चांगलेच आक्रमक झाले.

तर दुसरीकडे पोलिस अधिकारी देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बराच वेळ दोघांमध्ये वादावादी सुरू होती, तेव्हा काही प्रत्यक्षदर्शीणी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. सदर तरूणाला सोडून देण्यात आले, आणि आमदार बंब देखील तिथून निघून गेले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख