आमदार साहेब जरा उपजिल्हा रुग्णालयाचे हाल पहा, काकांचा पुतण्यावर निशाणा.. - MLA, look at the condition of the sub-district hospital, uncle's target on his nephew | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

आमदार साहेब जरा उपजिल्हा रुग्णालयाचे हाल पहा, काकांचा पुतण्यावर निशाणा..

राम काळगे
मंगळवार, 4 मे 2021

खासगी कोविड सेंटरमध्ये कोण तज्ञ डॉक्टर आहे? ज्यांच्या नावावर कोविड सेंटर सुरू आहे तो डाॅक्टर  हयात आहे का? याचा शोध प्रशासनाने घ्यावा.

निलंगा : उपजिल्हा रूग्णालयात सध्या बेड मिळत नाही,आॅक्सिजन वेळेवर येत नाही, रूग्णांचे मृत्यू होत आहेत. आपण या मतदार संघाचे लोकप्रतिनीधी आहात थोडे लक्ष द्या, असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर यांनी भाजपाचे माजीमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना लगावला आहे. 

विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर व त्यांचे चुलते काॅंग्रेसचे अशोक पाटील निलंगेकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. कोरोना प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्या वाढलेली असतांना निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयाची झालेली दुरावस्था पाहून अशोक पाटील निलंगेकर यांनी आपल्या पुतण्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

उपजिल्हा रुग्णालयांतील विविध प्रश्नांबद्दल पत्रकारांशी बोलतांना अशोक पाटील निलंगेकर म्हणाले, बाहेरून औषध आणायला लावल्याच्या कारणावरून वैद्यकीय आधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना कोणतीही चौकशी न करता तहसीलदारांनी पाठवलेल्या अहवालावरून निलंबित करण्यात आले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे रूग्ण व नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित केल्यानंतर  उपजिल्हा रूग्णालयात तात्काळ  तज्ञ डॉक्टर देण्याची गरज होती. पण तसे न केल्यामुळे २७ एप्रिल ते ४ मे दरम्यान २६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा निलंगेकर यांनी केला आहे.

ही बाब गंभीर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्या आधारे निलंबनाची कारवाई केली, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तडकाफडकी निलंबन का केले? याचा खुलासा करावा,अशी मागणी देखील अशोक पाटील यांनी यावेळी केली.  एक तर तज्ञ डाॅक्टर मिळत नाहीत, असलेल्या डॉक्टरांना किरकोळ कारणावरून निलंबीत केले जाते हा प्रकार चुकीचा आहे. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घ्या..

स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून  वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा आम्हाला पक्षीय पातळीवर दखल घ्यावी लागेल ,असा इशाराही त्यांनी दिला. पाटील यांचे निलंबन येथील खासगी डॉक्टराचे षडयंत्र असून शहरातील खासगी दवाखान्यात कोविड रूग्ण दाखल करून त्यांची सर्रासपणे लुबाडणूक केली जात असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. 

येथील खासगी कोविड सेंटरमध्ये कोण तज्ञ डॉक्टर आहे? ज्यांच्या नावावर कोविड सेंटर सुरू आहे तो डाॅक्टर  हयात आहे का? याचा शोध प्रशासनाने घ्यावा, असे आव्हान देखील अशोक पाटील यांनी प्रशासनाला दिले. 

माजीमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपजिल्हा रूग्णालयातील परस्थिती कशी आहे, येथे कोणतेही नियोजन नाही, बेड मिळत नाही, प्रमुख डॉक्टराचे नियंत्रण नसल्यामुळे रूग्ण तडफडत आहेत. येथील परस्थितीचा आढावा घ्यावा असा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला. 

येथील वैद्यकिय आधिकारी यांचे निलंबन चौकशीच्या आधीन राहून मागे घ्यावे, तहसीलदारांनी ज्या बाहेरील औषधांच्या पावत्या जप्त केले आहेत, त्या पावत्यावरील औषधांचा वापर दवाखान्यात भर्ती असलेल्या रूग्णाच्या दैनंदिन ट्रिटमेंन्टमध्ये केला आहे का?  जर केला असेल तर दवाखान्यात औषध नाहीत का? असा सवाल उपस्थित करून ट्रिटमेंन्ट पेपरवरील उपचारावरून सर्व कांही सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख