MLA Dheeraj Deshmukh on State Wildlife Board | Sarkarnama

राज्य वन्यजीव मंडळावर आमदार धीरज देशमुख

हरी तुगावकर
बुधवार, 8 जुलै 2020

नव्या पिढीवर वन्यजीवांच्या बाबतीत योग्य ते संस्कार घडवण्या कामी या निवडीचा उपयोग होईल असा विश्वास व्यक्त करून या निवडीबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे धीरज देशमुख यांनी आभार मानले आहेत.

लातूरः  महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळावर राज्य सरकारकडून पुढील तीन वर्षासाठी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या मंडळावर निवड झालेले ते राज्यातील एकमेव आमदार आहेत.

या वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे असून उपाध्यक्ष वनमंत्री संजय राठोड हे आहेत. नामनिर्देशीत सदस्य म्हणून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांचा देखील यात समावेश आहे. आमदार धीरज देशमुख यांचीही यात सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

या सोबतच वन्यजीव क्षेत्रात काम करणा-या बॉम्बे नॅचरल हिस्टरी, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट, इकोप्रो संस्था चंद्रपूर या संस्थामधील सदस्य व राज्यातील विविध जिल्ह्यातील काही व्यक्तींचा या मंडळात समावेश आहे.

महाराष्ट्र राज्यातील उपवने, अभयारण्य, शिकार स्थाने व बंदिस्त क्षेञाच्या बाबतीत राज्य सरकारला वेळो-वेळी मार्गदर्शन करणे, परवाना देण्याबाबत धोरण ठरवणे, या कामी सहकार्य करत महाराष्ट्रातील जैवविविधता अधिक संपन्न करण्यात या सदस्यांचे मोलाचे योगदान असणार आहे.

वन्यजीव व पर्यावरण बाबतीतील धोरण प्रभावीपणे राबवून या क्षेञात काम करणा-या संस्था व व्यक्तींच्या बाबतीत माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी नेहमीच सहकार्याची भूमिका पार पाडली होती. तोच विचार डोळ्यासमोर ठेवून राज्यातील व विशेषत: लातूर जिल्ह्यातील वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.

या माध्यमातून नव्या पिढीवर वन्यजीवांच्या बाबतीत योग्य ते संस्कार घडवण्या कामी या निवडीचा उपयोग होईल असा विश्वास व्यक्त करून या निवडीबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे धीरज देशमुख यांनी आभार मानले आहेत.

edited by- jagdish pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख