आमदार बंब यांच्या कोविड हाॅस्पीटलची मंत्री हसन मुश्रीफ यांनाही भुरळ - MLA Bamb's Kovid Hospital Minister Hasan Mushrif was also impressed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

आमदार बंब यांच्या कोविड हाॅस्पीटलची मंत्री हसन मुश्रीफ यांनाही भुरळ

जगदीश पानसरे
सोमवार, 3 मे 2021

एखाद्या खाजगी रुग्णालयात असतील तशा किंवा त्यापेक्षा अधिक सुविधा या कोविड हाॅस्पीटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद ः भाजप आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात शंभर आॅक्सिजन बेडचे सुसज्ज असे कोविड हाॅस्पीटल अवघ्या दहा दिवसांत उभारले. हवेतून आॅक्सिजन निर्मीतीच्या प्रक्लापासह २२ आयसीयू, व्हेंटिलेटरची देखील इथे व्यवस्था करण्यात आली आहे. मराठवाड्यातील हे पहिले एखाद्या लोकप्रतिनिधीने उभारलेले हाॅस्पीटल ठरले आहे. या कोविड हाॅस्पीटलची भुरळ राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील पडली. त्यांनी प्रशांत बंब यांना संपर्क साधून संपुर्ण माहिती घेत आपल्या मतदारसंघात देखील असेच कोविड हाॅस्पीटल उभारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

गंगापूर-खुल्ताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी तीन दिवसांपुर्वी लासूर स्टेशन येथील जैन मंगल कार्यालयात तीन मजली इमारतीमध्ये सर्व सुविधांनी युक्त असे शंभर बेडचे कोविड हाॅस्पीटील सुरू केले. तज्ञ डाॅक्टरांची टीम, नर्सिंग स्टाफ, रुग्णांना मोफत जेवण, चहा, पाणी अशी संपुर्ण व्यवस्था बंब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उभी केली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्च्युल पद्धतीने शुक्रवारी या कोविड हाॅस्पीटलचे उद्घाटन केले.

केवळ मराठवाड्यातच नाही तर राज्यात बंब यांच्या या कामाचे कौतुक होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील बंब यांच्या कोविड हाॅस्पीटलची माहिती घेण्यासाठी त्यांना नुकताच फोन केला होता. शिवाय आपल्या मतदारसंघात असे हाॅस्पीटल उभे करण्याची इच्छा व्यक्त केली. या शिवाय जैन पाईप या संस्थेकडून देखील बंब यांना या संदर्भात विचारणा झाली असल्याचे बंब यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.

मराठवाडा व शेजारच्या नगर जिल्ह्यातून देखील अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पुढारी बंब यांच्या कोविड हाॅस्पीटलची पाहणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण, भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार संतोष दानवे आदींनी देखील बंब यांच्या कोविड हाॅस्पीटलला भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले.

दोन दिवसांत ५७ रुग्ण दाखल..

एखाद्या खाजगी रुग्णालयात असतील तशा किंवा त्यापेक्षा अधिक सुविधा या कोविड हाॅस्पीटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या हाॅस्पीटलची किती गरज होती हे दोनच दिवसांत इथे दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येवरून दिसून आले आहे. आजघडीला लासूरच्या या कोविड हाॅस्पीटलमध्ये एकूण ५७ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. पैकी १८ रुग्ण हे आयसीयूमध्ये तर ३ व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. या शिवाय ३६ रुग्ण हे आॅक्सिजनबेडवर उपचार घेत असल्याचे बंब यांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत आॅक्सिजन सिलेंडरची संख्या वाढवून आणखी रुग्णांना इथे उपचार देण्यात येतील. हे कोविड हाॅस्पीटल किमान एक वर्ष सुरू ठेवण्याचा माझा मानस आहे. जेणेकरून कोरोनाची लागण झालेल्या कुठल्याही रुग्णाला उपचारापासून वंचित राहावे लागणार नाही, असेही बंब म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख