मंत्री महोदय,आमच्या शहराला दररोज पाणी मिळेल का? - Minister, will our city get water every day? | Politics Marathi News - Sarkarnama

मंत्री महोदय,आमच्या शहराला दररोज पाणी मिळेल का?

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

प्राधान्य क्रम ठरवून ग्रामीण प्रमाणेच शहरी भागाचा देखील जल मिशन योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच इम्तियाज जलील यांच्या मागणीचा विचार करून त्यांच्या शहराचा समावेश या योजनेत करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ.

औरंगाबाद ः मंत्री महोदय, मी ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, त्या औरंगाबाद शहरात पाच, सात आणि नऊ दिवसांनी पाणी मिळते. यामुळे आमची मान शरमेने खाली जाते. केंद्र सरकारने घर घर जल योजना लागू केली आहे, या अंतर्गत आमच्या शहराला येत्या दीड-दोन वर्षात दररोज पाणी मिळले का? असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी संसदेत संबंधित मंत्र्यांना केला.

औरंगाबाद शहराला गेल्या अनेक वर्षांपासून आठवडाभरात एकदा पाणीपुरवठा केला जातो. अवघ्या ३५-४० किमी अंतरावर जायकवाडी सारखे मोठे धरण आहे, परंतु तिथून पाणी उपसा करून ते शहरात आणण्याची व्यवस्था इतक्या वर्षात आम्ही उभी करू शकलो नाही. तेव्हा जल मिशन योजनेत औरंगाबादचा समावेश आपण करणार का? अशी विचारणा इम्तियाज जलील यांनी केली.

या प्रश्नाला उत्तर देतांना जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरात विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये, त्यांना दुषित पाणी प्यावे लागू नये यासाठी २०१९ मध्ये जल जीवन योजना लागू केली. यात प्रामुख्याने ग्रामीण भागाचा समावेश करण्यात आला. परंतु जसे इम्तियाज जलील यांनी त्यांच्या शहरातील पाण्याचा प्रश्न उपस्थित केला, अशीच समस्या काही शहरी भागात देखील आहे. 

त्यामुळे प्राधान्य क्रम ठरवून ग्रामीण प्रमाणेच शहरी भागाचा देखील जल मिशन योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच इम्तियाज जलील यांच्या मागणीचा विचार करून त्यांच्या शहराचा समावेश या योजनेत करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. दीड-दोन वर्ष नाही पण येत्या वर्षातच आपल्या शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा व योजनेत समावेश करू, असा विश्वास शेखावत यांनी इम्तियाज जलील यांना दिला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख