राज्यमंत्री सत्तार यांच्या मुलाचा जंगी वाढदिवस, पण नो मास्क, नो सोशल डिस्टन्सिंग.. - Minister of State Sattar's son's birthday, but no mask, no social distance | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री सत्तार यांच्या मुलाचा जंगी वाढदिवस, पण नो मास्क, नो सोशल डिस्टन्सिंग..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पहिल्यांदाच आमेर यांचा वाढदिवस सत्तार यांनी जाहीरपणे साजरा केल्याने ते आपल्या दुसऱ्या मुलाला देखील राजकारणात आणणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

औरंगाबाद ः महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव आमेर यांचा वाढदिवस काल सिल्लोड येथे साजरा झाला. सत्तार व त्यांच्या शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत भलामोठा केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. पण ना कुणी तोंडाला मास्क लावला होता, ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. त्यामुळे संपुर्ण राज्याला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे महत्व समजावून सांगणारे राज्याचे मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला त्यांच्याच मंत्र्यांकडून असा हरताळ फासला जात असल्याचे दिसून आले.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात चांगले काम केले. निर्जंतुकीकरण, साबण, मास्क वाटप, घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी, जोशिंदा काढ्याचे वाटप असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या या कामाचे मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केले. पण जरा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला की, सर्व सामान्यामप्रमाणे मंत्री महोदयांचा निष्काळजीपणा देखील समोर आला आहे.

सत्तार यांचे धाकडे चिरंजवी आमेर यांचा काल वाढदिवस होता. आमेर हे राजकारणापासून तसे दुर, तर थोरले समीर सत्तार हे सक्रीय. त्यामुळे सिल्लाोडकरांना आतापर्यंत समीर सत्तार यांच्याच वाढदिवसाचा केक खाण्याचा योग आला होता. पण पहिल्यांदाच आमेर यांचा वाढदिवस सत्तार यांनी जाहीरपणे साजरा केल्याने ते आपल्या दुसऱ्या मुलाला देखील राजकारणात आणणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

आमेर यांचा वाढदिवस सत्तार यांच्या समर्थकांसह आमेर यांच्या मित्रांच्या उपस्थितीत साजरा केला गेला. विशेष म्हणजे राज्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता गर्दी करू नये, सामाजिक अंतर राखावे, मास्क घालावा या आधीच्याच गोष्टींची आठवण वारंवार करून दिली जात आहे. मात्र याचा विसर राजकारण्यांना व अशा प्रकारे गर्दी जमवून वाढदिवस साजरा करणाऱ्यांना पडल्याचा दिसतो. सत्तार यांच्या चिरंजिवांच्या वाढदिवसात देखील हेच चित्र दिसले.

सत्तार यांच्यासह वाढदिवस असलेले आमेर, त्यांचे भाऊ समीर सत्तार व उपस्थित सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी विना मास्क होते. त्यामुळे मुख्यमंत्री राज्यातील जनेतेला पोटतिडकीने कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करत असतांना त्यांच्याच मंत्र्यांकडून अशा प्रकारची बेफिकरी होत असेल तर सामान्य माणसांनी काय धडा घ्यावा, असा प्रश्न पडतो.

Edited By : Jagdish Pansare 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख