नांदेडकरांनो यवतमाळ,अकोला,अमरावती जवळ असल्याने खबरदारी घ्या.. - Minister Aschok Chavan sya,s Be careful as Nandedkars are near Yavatmal, Akola, Amravati | Politics Marathi News - Sarkarnama

नांदेडकरांनो यवतमाळ,अकोला,अमरावती जवळ असल्याने खबरदारी घ्या..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

लाॅकडाऊनचे फटके आपण सगळ्यांनी सोसले आहेत, पुन्हा ती परिस्थिती येऊ द्याचची का? याचा विचार आपल्याला करायचा आहे.

औरंगाबाद ः नांदेडकरांनो शेजारच्या यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढला आहे. हे तीन्ही जिल्हे नांदेडपासून फार लांब नाहीत, आपला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या जिल्ह्यांशी संपर्क येतो तेव्हा काळजी घ्या, कोरोनाचे नियम पाळा आणि कोरोना टाळा, असे आवाहन नांदडेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आणि राज्यात वाढत चाललेली रुग्णांची संख्या या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी आज नांदेडकरांना आवाहन केले. एम्सच्या तज्ञ डाॅक्टरांचा हवाला देत चव्हाण म्हणाले, भारतात दुसऱ्या स्ट्रेनच्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, आधीच्या विषाणूपेक्षा हा अधिक घातक आणि परिणामकारक आहे.

त्यामुळे ज्यांना याआधी कोरोना होवून गेला त्यांना आणि ज्यांच्या शरीरात अॅन्टीबाॅडीज आहेत, अशांना देखील या नव्या विषाणूची लागण होऊ शकते. कोरोना रोखण्यासाठीची लस आली असली तरी ती अजूनही सर्वसामान्यापर्यंत पोहचलेली नाही. मार्च महिन्यात ती सर्वसामान्यांना मिळण्याची शक्यता असली तरी तिचा परिणाण आणि शरीरातील रोगप्रतिकारक पेशी वाढवण्यासाठी २८ ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. तेव्हा जशी काळजी आपण यापुर्वी घेत आलो आहोत, तशीच इथून पुढे देखील घ्यावी लागणार आहे.

लाॅकडाऊनचे फटके आपण सगळ्यांनी सोसले आहेत, पुन्हा ती परिस्थिती येऊ द्याचची का? याचा विचार आपल्याला करायचा आहे. सार्वजनिक कार्यक्रम,मेळावे, सभा अशा सगळ्या गोष्टींना आळा घालण्यात आला आहे. लग्न समारंभ देखील मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, आपण ग्रीन झोनमध्ये असलो तरी कोरोना गेला असे मानण्याची चूक कुणीही करू नये.

शहरात महापालिका व ग्रामीण भागात जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व संपुर्ण प्रशासकीय यंत्रणा योग्य ते उपाय आणि खरबदारी घेत आहेत. कोरोना चाचण्यांची संख्या देखील आपण वाढवली आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नांदेडकरांनी यापुर्वी खूप सहकार्य केले आहे, आताही त्याची गरज असल्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख