औरंगाबाद : केरळसह, राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणांना आवश्यक प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासोबतच कोरोना संसर्ग वेळीच रोखण्याच्या दृष्टीने जनतेने अधिक खबरदारी घेत मास्कसह सर्व प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक कार्यवाही बाबत डॉ. अनंत गव्हाणे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्यासह मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच विभागीय आयुक्तांव्दारे निर्देशित करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे तातडीने पालन करण्यात येत असून प्रशासनातर्फे वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नागरिकांनीही यात सक्रीय सहभाग घेऊन स्वत:सह शहराच्या जीवीताच्या सुरक्षेच्या जबाबदारीतून कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे अधिक काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले.
वाढता संसर्ग रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले असून सर्दी, ताप, खोकला या कोविड सदृश्य लक्षणांच्या रूग्णांना तातडीने कोरोना चाचणी करण्याबाबत सूचित करण्याचे खासगी डॉक्टरांना निर्देशित केले आहे. त्याचप्रमाणे लग्नसमारंभ, इतर कार्यक्रमामध्ये मास्क वापर, सॅनिटायजर, सामाजिक अंतर या त्रिसुत्रीचा वापर करण्याबाबत खबरदारी घेण्याचे मंगलकार्यालय चालकांना तसेच कोचिंग क्लासेस संचालकांना निर्देशित केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार दंडात्मक कार्यवाही देखिल केली जाणार आहे.
कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात ११५ उपचार सुविधा उपलब्ध असून ९९ हजार ७६३ खाटा, ५३२ आयसीयु, ३०० व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गाच्या आपत्तीसोबत नागरिकांच्या सोबतीने प्रशासन लढा देत असून गेल्या महिनाभरापर्यंत जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात यंत्रणांना यश मिळाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६ हजार २३५ रूग्ण बरे झाले असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३७ टक्के आहे. तर मृत्यूदर २.६० टक्के इतका आहे.
लसीकरणाचा पुढील टप्पा १६ पासून
मात्र गेल्या आठवडाभरापासून नवीन रूग्ण वाढीचे प्रमाण वाढले असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सहकार्य करत सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन देखील गव्हाणे यांनी केले. जिल्ह्यात लसीकरणालाही सुरवात झाली असून ४१.५४ टक्के लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. १६ मार्च नंतर पन्नाशीच्या पुढच्या लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लस घेतली असून सर्वांनी कोणतीही शंका न घेता लसीकरण करावे, असेही गव्हाणे म्हणाले.
ग्रामीण भागात संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने पाहणी पथक तालुक्यांमध्ये नियुक्त करण्यात आले असून महसूल, ग्रामविकास, पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा त्यात सहभाग असेल. हे पथक मास्क वापरासोबत कोविड नियमावलीचे पालन काटेकोरपणे होण्याच्या दृष्टीने पाहणी करणार आहे.
पोलीस आयुक्त गुप्ता यांनी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना खबरदारी घेत नियमांचे पालन करत जयंती साजरी करण्याचे आवाहने केले. तसेच पुन्हा लॉकडॉऊन लावण्याची वेळ येणे योग्य ठरेल काय याचा गांभिर्याने विचार करुन प्रत्येकाने खबरदारी बाळगत नियमांचे पालन करुन प्रशाासनाला सहकार्य करावे. दुसऱ्या संसर्गाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गाफील न राहता सतर्कता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.
दहावी, बारावी वगळत इतर विद्यार्थ्यांना सूट
मनपा आयुक्त पांडेय यांनी शहरात आतापर्यत ३० हजार ५४४ रुग्ण बरे झाले असून यंत्रणांना आता कोरोना संकटाचा अनुभव आलेला आहे. त्या दृष्टीने सर्व प्रतिबंधात्मक कार्यवाही, उपाययोजनांसह यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. नागरीकांनी मास्क वापरुन कोवीड नियमावलीचे योग्य पालन केले तर रुग्ण संख्या वाढणार नाही. संसर्गाला आपण रोखू शकू, असे सांगून वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शहरातील १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यां व्यतिरीक्त इतर वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याची सवलत २८ फेब्रुवारीपर्यत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
चाचण्यांची सुविधा सुरु असून रेल्वे, बस स्थानकावरही चाचण्या सुरु आहेत. तरी जनतेने नियम पाळत स्वत:सह शहरालाही सुरक्षित ठेवण्याची गरज असून रुग्ण वाढीनुसार प्रतिबंधात्मक उपाय वाढवण्यात येतील, असेही पांडेय यांनी स्पष्ट केले. पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी मास्क ही संरक्षक ढाल असून प्रत्येकाने स्वंयस्फुर्तीने त्याचा वापर करावा, असे आवाहन केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी मुलीच्या विवाहाचा समारंभ केला रद्द
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मुलीच्या विवाह निमित्त दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी हॉटेल अजंता ॲम्बेसेडर येथे नियोजित कार्यक्रम संसर्गाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी यांनी रद्द केला असून या कार्यक्रमासाठी निमंत्रण पाठवलेल्या सर्वांना जिल्हाधिकारी यांनी आपापल्या घरूनच शुभेच्छा देण्याचे आवाहन केले आहे.
Edited By : Jagdish Pansare

