मलाही कधीतरी शिवजयंती समितीचा अध्यक्ष करा ः इम्तियाज जलील - Make me the chairman of Shiv Jayanti Samiti sometime: Imtiaz Jalil | Politics Marathi News - Sarkarnama

मलाही कधीतरी शिवजयंती समितीचा अध्यक्ष करा ः इम्तियाज जलील

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

जिल्ह्याचा खासदार या नात्याने आता मलाही शिवजयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष होण्याची संधी द्या. अशी मागणी संस्थापक अध्यक्षांसह व्यासपीठावर उपस्थित भुमरे, जैस्वाल यांच्याकडे कटाक्ष टाकत केली.

औरंगाबाद ः राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची तयारी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही बंधने आणली असली तरी शिवभक्तांमधील उत्साह कमी झालेला नाही. अशातच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मलाही कधीतरी शिवजंयती समितीचा अध्यक्ष करा हो, अशी लाडीक विनंती केली आहे.

औरंगाबाद जिल्हा शिवजंयती महोत्सव समितीच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या समितीच्या अध्यक्षपदाचा मान दरवर्षी विविध राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींना दिला जातो. गेल्या अनेक वर्षांची शिवजयंती साजरी करण्याची परंपरा ही समिती जपत आली आहे. काल समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी एकत्र जमले होते.

शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या उपस्थितीत राज्याचे फलोत्पादन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह पहिल्यांदाच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील कार्यालयाच्या उद्धाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. समितीच्या वतीने त्यांना रितसर निमंत्रण पाठवण्यात आले होते.

यावेळी बोलण्याची संधी मिळताच इम्तियाज जलील यांनी समितीच्या नियमाप्रमाणे जिल्ह्याचा खासदार या नात्याने आता मलाही शिवजयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष होण्याची संधी द्या. अशी मागणी संस्थापक अध्यक्षांसह व्यासपीठावर उपस्थित भुमरे, जैस्वाल यांच्याकडे कटाक्ष टाकत केली. यावर नक्की तुम्हाला पुढच्या वर्षी अध्यक्ष करू, असे म्हणत या सर्वांनी इम्तियाज यांना प्रतिसाद दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंतचे सगळेच सण, उत्सव आपण घरात साजरे केले. आता कुठे कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला आहे. पण  पुर्ण धोका अजूनही टळलेला नाही. रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवजंयती मिरवणूकीत फक्त शंभर जणांनाच उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे.

बंधने असली तरी शिवप्रेमींचा उत्साह मात्र कायम आहे. आता व्यासपीठावर सरकारमधील मंत्री भुमरे साहेब बसलेले आहेत, त्यांनी शिवजयंती संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून काही तरी मार्ग काढावा, असा टोला देखील इ्म्तियाज जलील यांनी यावेळी लगावला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख