बीड जिल्ह्याच्या कर्जमाफीत महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच भारी..

महायुती सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपयांची पीक कर्जमाफी मिळाली होती. आताच्या महाविकास आघाडीच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी सन्मान योजनेतून आतापर्यंत ११०७ कोटी रुपये मिळाले असून आणखी यात ८८० कोटी रुपयांची भर पडणार आहे.
mahvikas aghadi greater than bjp alliancce government news
mahvikas aghadi greater than bjp alliancce government news

बीड : सरकार कोणते चांगले असे विचारले तर प्रत्येकजण आपल्या राजकीय दृष्टीकोनातून उत्तर देईल. पण, दोन्ही सरकारच्या काळातील कर्जमाफीतून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या लाभाच्या आकडेवारीची तुलना केली तर महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच भारी म्हणावी लागेल. तत्कालिन महायुती सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८५३ कोटी रुपयांच्या माफीचा लाभ मिळाला होता. तर आताच्या महाविकास आघाडीच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून आजघडीला ११०७ कोटी रुपये मिळाले असून हा आकडा तब्बल १९८७ कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. म्हणजेच कर्जमाफीच्या रक्कमेत आणखी ८८० कोटी रुपयांची भर पडणार आहे.

आजघडीला महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेतून दोन लाख पाच हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात ११०७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील माफी रकमेपेक्षा आताच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून मिळालेली रक्कम तब्बल २५४ कोटी रुपयांनी अधिक आहे. विशेष म्हणजे आणखी ८८० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. जुन २०१६ पर्यंत पीक कर्ज खाते थकीत असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दिड लाख रुपयांची माफी जाहीर केली होती. मागच्या वेळी एक लाख ४० हजार शेतकऱ्यांना दिड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ झाला होता. त्यापोटी त्यांना ७१५ कोटी रुपये कर्जमाफी मिळाली होती. तर, ओटीएस असलेल्या आठ हजार ८८२ खातेदारांना ८७ कोटी रुपयांचा लाभ मिळाला होता. नियमित पिक कर्जाची परतफेड करणाऱ्या ३६ हजार २०० शेतकऱ्यांना ५१ कोटी ४४ लाख रुपयांचा लाभ झाला होता. असा एकूण एक लाख ८२ हजार ३७५ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ८५३ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती.

तीन लाख वीस हजार शेतकऱ्यांना लाभ..

आताचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या याजनेतील विविध अटींमध्ये ३ लाख २० हजार शेतकरी पात्र ठरतील असा अंदाज बँकांनी बांधाला आहे. या शेतकऱ्यांना १९८६ कोटी ८८ लाख रुपयांचा लाभ मिळू शकेल असे त्यांच्याकडील विहित मुदतीत थकलेल्या कर्जाच्या आकड्यांतून दिसते. यावेळी एक एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकित पीक कर्ज खातेदाराला सरसकट माफी मिळणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अग्रणी बँकेने बँकनिहाय पात्र ठरु शकणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांची आकडेवारी एकत्रित केली आहे. यानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभासाठी थकित कर्जाच्या मुदतीत बसणारे तीन लाख तीन हजार ७८२ कर्जदार शेतकरी आहेत. तर, पुर्नगठण केलेल्या १६ हजार ८४३ शेतकऱ्यांनाही या माफीचा लाभ भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागच्या कर्जमाफीपेक्षा यंदा ११३४ कोटी रुपये अधिक मिळतील असा अंदाज आहे.

मागच्या वेळी जाहीर केलेल्या दिड लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी थकित कर्जाची त्यापुढील रक्कम भरणे अनिवार्य होते. त्यामुळे ज्यांना पुढील रक्कम भरणे शक्य होते वा ज्यांची कर्जाची रक्कम दिड लाखांपर्यंत होती त्यांनाच याचा लाभ झाला. यावेळी दोन लाख रुपयांपर्यंतची थकीत कर्जाला सरसकट माफी आहे. त्यामुळे मागच्या वेळी केवळ एक लाख ८२ हजार ३७५ शेतकऱ्यांना ८५३ कोटी ७२ लाख रुपयांचा लाभ झाला होता. यावेळी मात्र तीन लाख २० हजार ६२५ शेतकऱ्यांना १९८६ कोटी ८८ लाख रुपयांचा लाभ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आतापर्यंत दोन लाख २६ हजार शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली असून यापैकी दोन लाख पाच हजार शेतकऱ्यांच्याखात्यावर ११०७ कोटी रुपयांची रक्कम जमाही झाली आहे. 

दरम्यान, आतापर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ७१ हजार खातेदारांना ४७६ कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या ४६ हजार खातेदारांना ३०२ कोटी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४८ हजार शेतकऱ्यांना २२१ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्रच्या नऊ हजार शेतकऱ्यांना ४८ कोटी, बडोदा बँकेच्यादोन हजारांवर शेतकऱ्यांना १५ कोटी, बँक ऑफ इंडियाच्या दोन हजार शेतकऱ्यांना १४ कोटी तर सेंट्रल बँकेच्या साडेतीन हजारांवर शेतकऱ्यांना २६ कोटी रुपयांची पिक कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे.

Edited By: Jagdish pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com