The lockdown helped the needy, now the development work has started | Sarkarnama

लॉकडाऊनमध्ये गरजूंना मदत झाली, आता विकासकामांना सुरूवात..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 जून 2020

आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे काही दिवसांत जनजीवन सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अशावेळी मतदारसंघातील रखडलेली विकासकामे मंजुर करण्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भर दिल्याचे दिसते आहे.

औरंगाबादः कोरोना या जागतिक महामारीने राज्य आणि शहराच्या विकासाची चक्रे थांबली आहेत. लॉकडाऊन-४ नंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हा शब्द मी आता केराच्या टोपलीत टाकतोय म्हणत ‘ मिशन बिगिन अगेन'चा संदेश दिला होता. त्यानूसार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत.

दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये गरजूंना अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू वाटप करत दिलासा दिल्यानंतर आता मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पश्चिम विधानस मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी आज सातारा देवळाई परिसरात मंजुर झालेल्या पण लॉकडाऊनमुळ रखडलेल्या विकासकामांचा नारळ वाढत त्याला सुरुवात केली.

कोरोनाच्या विळख्यात संपुर्ण जगच सापडले आहे. या महामारीचा प्रसार रोखून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात व देशात गेले दोन महिने लॉकडाऊन होता. नागरिकांनी त्याचे काटेकोरपणे पालन करत कोरोनाच्या संकटात मोलाचे सहकार्य केले.

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन-५ ची घोषणा केली आणि आता आणखी एक महिना घरात बसायचे का? असा प्रश्न सर्वांनाच पडला. पण राज्याचे आर्थिक चक्र सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधून बऱ्याच प्रमाणात सुट दिली आहे.

त्यामुळे आता नागरिकांचे रस्ते, पाणी, वीज या मुलभूत गरजा आणि समस्या मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी गोरगरीब नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले होते. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे काही दिवसांत जनजीवन सुरळीत होण्यास मदत होणार आहे. अशावेळी मतदारसंघातील रखडलेली विकासकामे मंजुर करण्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भर दिल्याचे दिसते आहे.

लॉकडाऊन-४ ची मुदत काल संपली आणि मिशन बिगिन अगेन या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत संजय शिरसाट यांनी मतदारसंघातील देवळाई-सातारा परिसरातील मंजुर रस्त्याच्या कामांना सुरूवात केली. परिसरातील नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवत विकासकामांचा शुभारंभ करतांनाच लॉकडाऊनमुळे रखडलेली कामे वेगाने पुर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख