नांदेड जिल्हा बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देऊ..

मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे.
Minister ashok chvan Reaction After District Bank Victory news nanded
Minister ashok chvan Reaction After District Bank Victory news nanded

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत १७ जागांसह दणदणीत विजय मिळवल्यावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सर्व विजयी संचालकांचे अभिनंदन केले आहे. कधीकाळी नफ्यात असलेली आणि शेतकरी, शेतमजुर, कष्टकरांचे हित जपणारी बॅंक चुकीच्या लोकांच्या हातात गेली होती. आता बॅंकेचा जुना सुवर्णकाळ पुन्हा आणू अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा देतांनाच भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना टोला लगावला.

नांदेड जिल्हा बॅंकेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर अशोक चव्हाण यांनी या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली. चव्हाण म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १२, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे. समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासदांचेही मी आभार मानतो. जिल्हा बॅंकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे.

त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे. जिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे.

ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, याचा मला विश्वास असल्याचे चव्हाण म्हणाले.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व माजी मंत्री गंगाधर कुटुंरकर यांचे नुकतेच झालेले निधन आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अशोक चव्हाण यांनी नवनिर्वाचित संचालक व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकरत्यांना विजयी जल्लोष साजरा न करण्याचे आवाहन देखील केले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com