Latur pattern is puer gold, old memories awakened by Dheeraj Deshmukh | Sarkarnama

लातूर पॅटर्न बावनकशी सोनं, धीरज देशमुखांनी जागवल्या जुण्या आठवणी...

जगदीश पानसरे
शुक्रवार, 31 जुलै 2020

लातूर पॅटर्न हे बावनकशी सोनं आहे, ते अफवा किंवा अपघाताने मिळालेलं यश नाही, तर मेहनत आणि सातत्याने मिळालेले आहे. त्यामुळे असे आरोप करून आमच्यावर अन्याय करू नका. मी जेव्हा शिक्षण खात्याचा मंत्री नव्हतो, माझ्याकडे दुसरे खाते होते तेव्हा देखील लातूरची मुलं पहिली आली होती‘ अस विलासरावांनी लातूर पॅटर्नवर टिका करणाऱ्यांना निक्षूण सांगितले होते.

औरंगाबाद ः कधी काळी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशात प्रसिध्द होता. राज्याच्या नाही तर देशातील कानाकोपऱ्यातून मुलं शिक्षण घेण्यासाठी लातूरात यायची. पण मध्यंतरीच्या काळात या लातूर पॅटर्नला काही प्रमाणात गळती लागली आणि त्यावर टिका होऊ लागली. परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी आणि बारावीच्या निकलाने पुन्हा एकदा लातूर पॅटर्नची जोरदार चर्चा राज्यात सुरू झाली आहे. दहावीच्या निकालात पैकीच्या पैकी मार्क घेणाऱ्या सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या ही लातूर जिल्ह्यातील आहे. त्यामुळे लातूर पॅटर्नवर टिका करणाऱ्यांना काही वर्षांपुर्वी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी चांगले उत्तर दिले होते. ‘लातूर पॅटर्न हे बावनकशी सोनं आहे‘, या त्यांच्या जुन्या विधानाची आठवण त्यांचे पुत्र व लातूर ग्रामीणचे कॉंग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी करून दिली आहे.

राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. सर्वाधिक ९८.७७ टक्के निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद आणि लातूर विभागाची यावेळी बऱ्यापैकी घसरण झालेली पहायला मिळाली. पण यात एक महत्वाची आणि विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे राज्यात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल १५१ विद्यार्थी हे लातूर जिल्ह्यातील आहे. २०१७ पासून लातूर जिल्ह्याने या यशामध्ये सातत्य राखले आहे. यंदा त्यांनी मागचे सगळे विक्रम मोडीत काढत लातूर पॅटर्नचा ठसा पुन्हा एकदा राज्यातील शिक्षणावर उमटवला आहे.

लातूर पॅटर्न हा राज्याची शान म्हणून ओळखला जायचा. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यापासून जिल्ह्यातील हा लौकिक कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. परंतु कालांतराने शिक्षणक्षेत्रात व्यावसायिक स्पर्धा वाढली आणि त्याचा फटका लातूर पॅटर्नला देखील बसला. ज्या लातूर पॅटर्नचे कौतुक केले जायचे, त्यावर टिका केली जाऊ लागली. विलासराव देशमुख राज्यात शिक्षणमंत्री असतांना ते शिक्षण मंत्री आहेत म्हणून लातूरची मुलं पहिली येतात, असा आरोप देखील केला जायचा.

आमच्यावर अन्याय करू नका..

यावर विलासराव देशमुखांनी एकदा जाहीर कार्यक्रमात नाराजी व्यक्त करतांनाच ‘ लातूर पॅटर्न हे बावनकशी सोनं आहे, ते अफवा किंवा अपघाताने मिळालेलं यश नाही, तर मेहनत आणि सातत्याने मिळालेले आहे. त्यामुळे असे आरोप करून आमच्यावर अन्याय करू नका. मी जेव्हा शिक्षण खात्याचा मंत्री नव्हतो, माझ्याकडे दुसरे खाते होते तेव्हा देखील लातूरची मुलं पहिली आली होती‘ अस विलासरावांनी लातूर पॅटर्नवर टिका करणाऱ्यांना निक्षूण सांगितले होते.

दहावीच्या निकालातील लातूर विभागाचे यश असेच मान उंचावणारे आहे. त्यामुळे या पॅटर्नवरून झालेली टिका अजूनही लातूरकर आणि इथल्या नेत्यांच्या मनात घर करून आहे. या पैकीच एक म्हणजे विलासराव देशमुख यांचे धाकटे चिरंजीव आमदार धीरज देशमुख. दहावी निकालाच्या निमित्ताने चालून आलेली संधी साधत धीरज यांनी आपले वडील विलासराव देशमुख यांचा तो जुन् व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा तर दिलाच, पण लातूर पॅटर्नला नावे ठेवणाऱ्यांना सणसणीत उत्तरही दिले आहे. धीरज यांच्या ट्विटनंतर राज्यात पुन्हा एकदा लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख