The killer of Pashupatinath Maharaj was arrested from Telangana | Sarkarnama

पशुपतीनाथ महाराजांसह शिष्याच्या हत्ये प्रकरणी आरोपीला तेलंगणातून अटक

सरकारनामा ब्युरो
रविवार, 24 मे 2020

पंधरा दिवसांपूर्वी या आरोपीबद्दल उमरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परंतु त्या वेळेस सुद्धा उलट तक्रार करण्याऱ्या गावकऱ्यांनाच पोलीस निरीक्षक अनंतरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आरोपीवर कसलीच कारवाई केली नाही. तेव्हा जर या आरोपीला अटक केली असती तर आज महाराजांचा जीव गेला नसता.

नांदेड : जिल्ह्यातील उमरी तालुक्याच्या नागठाणा बुद्रुक येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज यांची व त्यांच्या एका शिष्याची रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हत्या करण्यात आली. या घटनेने भाविकांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकाराची तुलना पालघरमधील साधुंच्या हत्येशी केली जात होती. राज्यात या प्रकरणावरून वातावरण तापत असतांनाच आरोपी साईनाथ लिंगाडे यास तेलंगणा राज्यातील तन्नुर येथून अटक करण्यात आली आहे.

खून्याला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांच्या नातेवाईक आणि भक्तांनी घेतली होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील नांदेडच्या पोलीस अधिक्षकांना आरोपीचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिसांना दहा तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.

नागठाणा येथे राज्य मठाधिपती बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज रहात होते. या मठामध्ये शिष्यगणही राहतात. नागठाणा येथे रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास पशुपतीनाथ महाराजांसह एका शिष्याचा खून करून मठातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज चोरण्यात आला होता. हा संशयीत आरोपी गावातीलच असल्याचे गावकरी सांगत आहेत.

महाराजांची हत्या करून त्यांच्याच गाडीमध्ये महाराजांचा मृतदेह टाकून गाडी पळवून नेण्याच्या आरोपीचा प्रयत्न होता. मात्र, शेजारील नागरिक तसेच मठाच्या गच्चीवर झोपलेले शिष्यगण जागे झाल्याने आरोपीने पळ काढला. गाडीमध्ये महाराजांचा मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली. मठाची पाहणी करत असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका शिष्याचाही मृतदेह सापडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

सर्वप्रथम आरोपीने शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या शिष्याची हत्या केली. त्यानंतर मठाच्या भिंतीवरून उडी मारून मठात प्रवेश केला. सर्व शिष्यगण मठाच्या गच्चीवर झोपलेले होते. महाराज एकटेच मठातील खोलीत झोपले असतांना आरोपीने दार तोडून आत प्रवेश केला आणि महाराजाची हत्या केली. त्यानंतर कपाटातील ऐवज घेऊन आरोपीने महाराजांचा मृतदेह त्यांच्याच गाडीमध्ये ठेवला. मात्र, गाडी काढत असताना मठाच्या गेटमध्ये गाडी अडकली, त्या आवाजाने गावकरी, शिष्यगण जागे झाले आणि आरोपी तेथून फरार झाला.

तर महाराजांचा जीव वाचला असता..

तर राज्यात साधू संत सुरक्षीत नसल्याचा आरोप भाजपचे नायगावचे आमदार राजेश पवार यांनी केला. बालतपस्वी पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या हत्येस आरोपी एवढेच पोलीस सुद्धा जबाबदार असून राज्यात साधु संत सुरक्षित नाहीत, हे पुन्हा सिद्ध झाले. नागठाणकार महाराजांच्या हत्येतील संशयित आरोपी साईनाथ लिंगाडे याच्यावर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्ह्याचे आरोप होत होते. या बाबतीत अनेकवेळा उमरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परंतु, पोलिसांनी तक्रार गांभीर्यानी घेतली नाही. 

पंधरा दिवसांपूर्वी या आरोपीबद्दल उमरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. परंतु त्या वेळेस सुद्धा उलट तक्रार करण्याऱ्या गावकऱ्यांनाच पोलीस निरीक्षक अनंतरे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आरोपीवर कसलीच कारवाई केली नाही. तेव्हा जर या आरोपीला अटक केली असती तर आज महाराजांचा जीव गेला नसता. पोलीस निरीक्षक अनंतरे यांच्याबद्दल मी हिवाळी अधिवेशनात देखील तक्रार केली होती. त्यापूर्वी जिल्हा पोलीस प्रमुख यांना सुद्धा लेखी तक्रार केली होती. परंतु त्यांनी सुद्धा या पोलिस निरीक्षकावर कसलीच चौकशी किंवा कारवाई केली नसल्याचा आरोप पवार यांनी केला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख