ख्वाजा युनूसची आई म्हणते, सचिन वाझेला पाठीशी घातले म्हणून सरकारला आमची हाय लगली.. - Khwaja Yunus' mother says, " government for backing Sachin Waze." | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ख्वाजा युनूसची आई म्हणते, सचिन वाझेला पाठीशी घातले म्हणून सरकारला आमची हाय लगली..

राजेश काटकर
गुरुवार, 18 मार्च 2021

माझ्या मुलाला मारून जाळून टाकणाऱ्या सचीन वाझे व अन्य पोलिस अधिकाऱ्यांना सरकारने पुन्हा सेवेत घेतले. एवढेच नाही तर त्यांना बढती दिली.

परभणी ः एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. यात परभणीच्या ज्या ख्वाजा यूनुसच्या प्रकरणात सचिन वाझे व अन्य पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होत्या, त्या युनूसच्या आईने `ही आमची या सरकारला लागलेली हाय`, असल्याचे म्हटले आहे. 

मनसुख हिरेन व प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेरील गाडीत जिलेटीनच्या कांड्या सापडल्याच्या प्रकरणात वाझे यांच्यावर विरोधी पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले. सरकारने या प्रकरणात कालच मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करून त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती केली.

या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांनी परभणी येथील मृत ख्वाजा युनूसच्या आईची भेट घेऊन त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. सचिन वाझेला अटक झाली म्हणून आज संपुर्ण मिडिया आणि राज्य सरकार देखील हलले आहे. सगळ्यांनाच वाझेंचे काय होणार याची चिंता लागून राहिली आहे. पण जेव्हा पोलिसांनी माझ्या मुलाला जेलमध्ये मारून त्याला जाळून टाकले. त्याचे प्रेत देखील आम्हाला दिले नाही, तेव्हा आई म्हणून माझ्यावर आणि आमच्या कुटुंबाची स्थिती काय झाली असले?  याचा कुणी विचार केला का?

माझ्या मुलाला मारून जाळून टाकणाऱ्या सचीन वाझे व अन्य पोलिस अधिकाऱ्यांना सरकारने पुन्हा सेवेत घेतले. एवढेच नाही तर त्यांना बढती दिली. या ऐवजी ज्या आईचा तरूण मुलगा पोलिसांनी मारून टाकला, त्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने मग ते कुठलेही असो त्यांनी त्या त्या वेळी प्रयत्न केले असते तर आज ही वेळच आली नसती. आम्हाला न्याय न देता पोलिसांना पाठीशी घातले म्हणून आमची हाय या सरकारला लागली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ख्वाजा यूनुसची आई आसिया बेगम यांनी दिली.

माझ्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवून त्याला मारून टाकण्यात आले. आम्ही न्यायासाठी लढा देत आहोत, पण अजून आम्हाला न्याय मिळाला नाही. आता तरी सरकारने आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून खटल्याला वेग द्यावा, अशी मागणी  देखील आसिया बेगम यांनी या निमित्ताने केली.

घाटकोपर येथे बेस्ट बसमध्ये २००२ मध्ये बॉम्बस्फोट घडवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ख्वाजा युनूस याच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप सचिन वाझे यांच्यासह दहा पोलिस अधिकार्‍यांवर होता. ख्वाजा युनूसला चौकशीसाठी नेले जात असताना पोलिसांच्या जीपला अहमदनगर येथे ६ जानेवारी २००३ च्या रात्री अपघात झाला.

त्या वेळी परिस्थितीचा फायदा घेऊन ख्वाजा युनूस पळून गेला होता असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र त्याला पोलिसांनीच कारस्थान रचून मारल्याचे आरोप झाले होते. ख्वाजा युनूस मृत्युप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे व तीन कॉन्स्टेबलच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी ५ डिसेंबर२००७ रोजी दिले होते.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख