खैरेंचे अजूनही दिल्लीत वजन, केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र देण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन.. - Khaire's weight still in Delhi, Health Minister's promise to provide Central Health Facility Center .. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

खैरेंचे अजूनही दिल्लीत वजन, केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र देण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

शिवसेना नेत्याच्या पत्राला  भाजपच्या केंद्रीय मंत्र्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

औरंगाबाद ः शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पक्षातील वजन घटले आहे, त्यांचे आता मातोश्रीवर चालत नाही, अशा चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात अधूनमधून होत असतात. भाजपचे खासदार डाॅ. भागवत कराड यांनी देखील अशीच टीका काही दिवसांपुर्वी केली होती. पण खैरे यांचे दिल्ली आणि मंत्रालयात अजूनही वजन असल्याची प्रचिती नुकतीच आली आहे. औरंगाबाद येथे केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र मंजुर करावे, यासाठी खैरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांना पत्र पाठवले होते. त्याला उत्तर देत तुमच्या मागणीचा विचार करून लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन हर्षवर्धन यांनी खैरे यांना पत्र पाठवून दिले आहे.

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद येथे केंद्र सरकार पुरस्कृत केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र (CGSH ) सुरू करावे, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी ७ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्याकडे पत्रद्वारे केली होती. त्यानंतर वारंवार पाठपुरावा देखील केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश येतांना दिसत आहे. २९ एप्रिल रोजी या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी खैरे यांच्या पत्राला उत्तर दिले. यात आपल्या मागणीचा मी गांभीर्याने विचार करत आहे, तसेच लवकरच केंद्रीय आरोग्य सुविधा केंद्र औरंगाबाद येथे सुरू करण्या संदर्भात निर्णय घेऊन तसे कळवेन असे या पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्र राज्यात केंद्राची आरोग्य सुविधा केंद्र केवळ चार ठिकाणी आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यभरातील रुग्णांना उपचारांसाठी या शहरांकडेच धाव घ्यावी लागते. औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीय कर्मचारी, माजी सैनिक, स्वातंत्र सैनिक, संरक्षण विभागाचे कर्मचारी, निवृत्त वेतनधारक आहेत. त्यामुळे औरंगाबाद येथे हे केंद्र व्हावे, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली.

औरंगाबादेत हे केंद्र झाल्यास हजारो केंद्रीय कर्मचारी व वयोवृध्द नागरिकांना उपचारासाठी २०० ते ४०० किलोमीटर लांब इतर शहरांमध्ये  जावे लागणार नाही, याकडे खैरे यांनी डाॅ. हर्षवर्धन यांचे लक्ष वेधले होते. या केंद्रामुळे दैनंदिन उपचाराबरोबर कोरोना तपासणी, उपचार, आणि निदान करणे सोपे जाईल. तसेच केंद्रीय कर्मचारी यांची होणारी धावपळ थांबेल. या सर्व बाबींचा गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची विनंती खैरे यांनी पत्रातून केली. 

सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रातील मोदी सरकार असा संघर्ष उडालेला आहे. अशाही परिस्थितीत शिवसेना नेत्याच्या पत्राला  भाजपच्या केंद्रीय मंत्र्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खैरे हे वीस वर्ष खासदार असल्यामुळे या काळात त्यांचे सर्वपक्षीय दिल्लीतील नेत्यांशी चांगले संबंध राहिले आहेत.

त्यामुळे खासदार नसतांना देखील ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या संपर्कात राहून तर कधी प्रत्यक्ष भेटी घेऊन जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असतात असे दिसून आले आहे.नुकतीच त्यांनी कन्नड तालुक्यातील औट्रम घाटातील बोगद्यासाठी नितीन गडकरी यांची भेट घेऊन हे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली होती.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख