खैरेंनी मातोश्रीवर माझ्या पंचवीस तक्रारी केल्या, मी एकही नाही

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मी नवा आहे, सहाकर क्षेत्रात मी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. याउलट अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे हे गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून सहकार क्षेत्रात काम करतात.
Aurangabad Shivsena - Chandrakant Khaire- Ambadas Danve News
Aurangabad Shivsena - Chandrakant Khaire- Ambadas Danve News

औरंगाबाद ः जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आपल्याला विश्वासात न घेता शिवसेनेने भाजपला सोबत घेतले असा आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना कोण अंबादास दानवे, त्यांना अजून खैरे कळलाच नाही, असा दम देखील खैरे यांनी भरला होता. त्याला अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊनच प्रत्युत्तर दिले. मी जिल्ह्याचा छोटा कार्यकर्ता आहे, ते राज्याचे, देशाचे नेते आहेत. त्यांनी मातोश्रीवर आतापर्यंत माझ्या पंचवीस तक्रारी केल्या, पण मी एकही तक्रार केली नाही, असे म्हणत दानवे यांनी खैरेंना टोला लगावला.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या ४८ तासांवर येऊन ठेपलेले असतांना शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या काॅंग्रेसला डावलून शिवसेनेने जिल्हा बॅंकेसाठी भाजपशी हातमिळवणी करत पॅनल उभे केले. मुख्यमंत्र्यांना वारंवार त्रास देऊन अडचणीत आणू पाहणाऱ्या भाजपला सोबत का घेतले? असा सवाल खैरे यांनी उपस्थित करत शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार व आमदार अंबादास दानवे यांच्यावर तोफ डागली होती.

एवढेच नाही तर थेट काॅंग्रेसच्या शेतकरी सहकार विकास पॅनलच्या व्यासपीठावर जात जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांना खडेबोल सुनावले होते. खैरेंच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शेतकरी विकास पॅनलचे अंबादास दानवे, नितीन पाटील व हरिभाऊ बागडे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अंबादास दानवे यांनी खैरेंच्या आरोपांना उत्तर दिले.

दानवे म्हणाले, चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे राज्य व देशाचे नेते आहेत, त्यांच्या पुढे मी एक सामान्य कार्यकर्ता, एका जिल्ह्याचा प्रमुख आहे. महाराष्ट्रात माझ्या सारखे चाळीस जिल्हाप्रमुख काम करतात. त्यामुळे मी छोटा तर खैरे हे मोठे नेते आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जे आरोप केले, ते चुकीचे आहे. त्यांनी थेट मला फोन करून विचारले असते तरी मी त्यांना सांगितले असते.

पक्षातील अंतर्गत गोष्टी पत्रकारांसमोर जाहीर करणे ही कोणती पद्धत आहे. राहिला प्रश्न त्यांना विश्वासात न घेण्याचा किंवा साईट ट्रॅक करण्याचा तर मी लहान कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांना साईड ट्रॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वरिष्ठ नेते त्यांना साईड ट्रॅक करत असतील तर मला माहित नाही. तुम्ही खैरेंना घाबरता का? या पत्रकारांच्या तिरकस प्रश्नावर देखील मी कुणालाच घाबरत नाही असे दानवे म्हणाले.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मी नवा आहे, सहाकर क्षेत्रात मी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. याउलट अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे हे गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून सहकार क्षेत्रात काम करतात. गेल्यावेळी देखील अशाच प्रकारे शिवसेना- भाजप, ऱाष्ट्रवादी-काॅग्रेस एकत्रपणे लढले होते, यात काही नवीन नाही, असे म्हणतानाच खैरे यांना सगळे माहित होते, असा दावा देखील अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com