Jayant Patil learned about the problems of milk traders in Parbhani. | Sarkarnama

जिल्हाध्यक्षाने मागणी करताच जयंत पाटलांकडून दुध व्यवसायिकांच्या साडेपाच कोटींचा प्रश्न मार्गी..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 22 मे 2020

एप्रिल २०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या दुधाचे जवळपास १ कोटी २५ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. ते शेतकऱ्यांना अदा करणे आवश्यक आहे, कारण याच पैशावर शेतकऱ्यांचा सर्व खर्च अवलंबून आहे. दुभत्या जनावरांची वैरण, खुराक, वाहतुकीचा खर्च इत्यादीसाठी पैसे नसल्याने त्याचा विपरीत परिणाम दुधाच्या उत्पादनावर झाला असल्याचेही सोनटक्के यांनी जयंत पाटलांच्या निदर्शनास आणून दिले.

परभणीः  परभणीच्या शासकीय दूध डेअरी मधील दूध उत्पादक शेतकऱ्यांची देयके ताबडतोब दिली जातील असे आश्वासन जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष जयंत पाटील यांनी आज दिले. राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी या संदर्भात पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांची अडचणी सांगितल्या. यावर सकारात्मक निर्णय घेत त्यांनी जुलै अखेरपर्यंत शेतकऱ्यांना देय असलेली साडेपाच कोटींची रक्कम देखील तात्काळ देण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सांगतो असे आश्वासनही दिले.

शासकीय दूध डेअरी मधील शेतकऱ्यांची दुधाची बिले मागच्या दोन महिन्यांपासून शासनाकडे बाकी आहेत. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. मागच्या दोन महिन्यातील जवळपास १ कोटी २५ लाख रुपयांची दूध उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी ताबडतोब अदा करावी अशी विनंती राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी व्हिडिओ कॉन्फरनसद्वारे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदमंत्री जयंत पाटील यांना केली. पाटील यांनीही सबंधित विभागाशी बोलून हा प्रश्न ताबडतोब सोडवला जाईल असे सांगितले.

परभणी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या शासकीय दूध संकलन केंद्रात जिल्ह्यातून हजारो शेतकरी दुधाचे संकलन करतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी हे उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. या संकलित दुधाची देयके दर पंधरा दिवसांनी अदा होतात. परंतु, या टाळेबंदीच्या काळात मात्र मागील दोन महिन्यांपासून शासनाकडून या दुधाची देयके देण्यात आली नाहीत. परभणी येथील शासकीय दूध संकलन केंद्राच्या व्यवस्थापकांनी वेळोवेळी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे या बाबत मागणी केलेली आहे.

एप्रिल २०२० पर्यंत शेतकऱ्यांच्या दुधाचे जवळपास १ कोटी २५ लाख रुपये शासनाकडे थकलेले आहेत. ते शेतकऱ्यांना अदा करणे आवश्यक आहे, कारण याच पैशावर शेतकऱ्यांचा सर्व खर्च अवलंबून आहे. दुभत्या जनावरांची वैरण, खुराक, वाहतुकीचा खर्च इत्यादीसाठी पैसे नसल्याने त्याचा विपरीत परिणाम दुधाच्या उत्पादनावर झाला असल्याचेही सोनटक्के यांनी जयंत पाटलांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत मागच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी परभणीतील शासकीय दूध संकलन केंद्राला भेट देऊन शेतकरी व तेथील कर्मचाऱ्यांशी चर्चा देखील केली होती.

शुक्रवारी (ता.22) राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फर्सिंगमध्ये हा विषय सोनटक्के यांनी मांडला. शेतकऱ्यांची आतापर्यंतची बाकी १ कोटी २५ लाख व जुलै अखेरपर्यंत आवश्यक असलेले ५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम ताबडतोब अदा करावी अशी मागणी केली. मंत्री जयंत पाटील यांनी ही रक्कम संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी बोलून ताबडतोब अदा केली जाईल असे सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख