कन्नडच्या राजकारणात ईशा झा यांची एन्ट्री; हर्षवर्धन, तेजस्विनी जाधवांकडून प्रमोशन?

हर्षवर्धन रायभान जाधव हे राजकारणातील एक वादग्रस्त तितकेच आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. एखाद्यावर सूड उगवायचा म्हटलं तर आपलं काहीही झालं तरी चालेल पण समोरचा उद्वस्त झाला पाहिजे ही त्यांची कार्यपद्धती.
Ex Mla Harshvardhan Jadhav- tesjaswini Jadhav and Isha Jha News Aurangabad
Ex Mla Harshvardhan Jadhav- tesjaswini Jadhav and Isha Jha News Aurangabad

औरंगाबाद ः कन्नड तालुक्यातील राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. स्व. रायभान जाधव यांच्यानंतर त्यांच्या पत्नी तेजस्विनी जाधव आणि मुलगा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मतदारसंघावर आपली पकड गेली कित्येक वर्ष कायम ठेवली होती. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला आणि तालुक्यावरील जाधवशाही संपुष्टात आली. पण वर्षभरातच कौटुंबिक, राजकीय आणि इतर सर्व संकटातून बोहर पडत हर्षवर्धन जाधव पुन्हा राजकारणात सक्रिय झाले आहेत.

विशेष म्हणजे ते आता एकटे नाहीत, तर त्यांची मैत्रीण ईशा झा देखील त्यांच्यासोबत असणार आहे.या दोघांवर तालुक्यातील जनेतेने तेवढेच प्रेम करावे, जेवढे स्व.रायभान जाधव आणि माझ्यावर केले होते, असे आवाहन माजी आमदार व हर्षवर्धन जाधव यांच्या मातोश्री तेजस्विनी जाधव सभा आणि मेळाव्यातून करतायेत. यातून कन्नडच्या राजकारणात ईशा झा यांची एकप्रकारे एन्ट्री झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

हर्षवर्धन रायभान जाधव हे राजकारणातील एक वादग्रस्त तितकेच आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. एखाद्यावर सूड उगवायचा म्हटलं तर आपलं काहीही झालं तरी चालेल पण समोरचा उद्वस्त झाला पाहिजे ही त्यांची कार्यपद्धती. जिल्हा परिषद निवडणुकीत पत्नीचा पराभव घडवून आणणाऱ्या शिवसेनेच्या नेत्याला देखील पराभूत करण्याचा निर्धार करत लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी आपला शब्द खरा करून दाखवला. स्वतः पराभूत झाले पण शिवसेनेच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलला. अर्थात शिवसेनेने देखील याची परतफेड विधानसभा निवडणुकीत केलीच.

त्यानंतर गेले वर्षभर हर्षवर्धन जाधव आणि वाद यांचे जणू नातेच जडले. कौटुंबिक कलह, भांडणे, संपत्तीचा वाद, पत्नीसोबत बिघडलेले संबंध व त्याची जाहिररित्या सोशल मिडियावर घडवून आणलेली चर्चा यामुळे हर्षवर्धन जाधव राज्यभरात चर्चिले गेले. हे कमी काय म्हणून पुण्यात आपली मैत्रीण ईशा झा हिच्या सोबत फिरतांना एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात जाधव यांना दीड महिना तुरुंगात देखील जावे लागले. आता बाहेर आल्यावर त्याच ईशा झा यांना सोबत घेऊन हर्षवर्धन जाधव हे राजकारणातील दुसरी इनिंग खेळू पाहत आहेत.

झा यांची भाषणबाजी आणि कौतुक..

पुण्यातील मारहाण प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर कन्नडमध्ये दाखल होताच पहिल्याच पत्रकार परिषदेत जाधव यांनी झा यांना सोबत घेतले. कुणी प्रश्न विचारण्या आधीच जाधव हे झा यांची ओळख करून देत होते. दोन-तीन पत्रकार परिषदेनंतर आता जाधव यांच्याकडून तालुक्यात घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक मेळावा आणि कार्यक्रमातून ईशा झा या जाधव यांच्यासोबत सावली सारख्या वावरतांना दिसतात.

दोन दिवसांपुर्वी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार व शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नावरील मेळाव्यात ईशा झा यांनी भाषण देखील केले. अस्सल राजकारण्या प्रमाणे हिंदी भाषेतील त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद देखील दिला. एवढेच नाही तर माजी आमदार तेजस्विनी जाधव यांनी तर ईशा झा यांचे कौतुक करतांना त्यांना ईश्वाराचा अवतार असे संबोधले. तसेच स्व. रायभान जाधव, मला आणि हर्षवर्धन, आदित्यला जसे प्रेम कन्नडच्या जनतेने दिले, तसेच प्रेम ईशाला देखील द्या,असे आवाहन केले. यावरून कन्नडच्या राजकारणात ईशा झा यांची भूमिका भविष्यात महत्वाची ठरणार असे दिसते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com