उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणात मुळचा बीडचा असलेल्या इरफान पठाणला अटक.. - Irfan Pathan, originally from Beed, arrested in Uttar Pradesh conversion case. | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणात मुळचा बीडचा असलेल्या इरफान पठाणला अटक..

दत्ता देशमुख-दिंगबर देशमुख
मंगळवार, 29 जून 2021

सिरसाळा येथील जायकवाडी वसाहतीत इरफानचे घर आहे. त्याचे वडील खाजाखा आमीरखा पठाण  हे एसटी महामंडळात नोकरीला होते, ते आता निवृत्त झाले आहेत.

बीड/सिरसाळा : उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरण देशभरात गाजत असतांना याचे धागेदोरे थेट मराठवाड्यातील बीड जिल्ह्यापर्यंत येऊन पोहचले आहेत. (Irfan Pathan, originally from Beed, arrested in Uttar Pradesh conversion case.) परळी तालुक्यातील सिरसाळा येथील मूळ रहिवासी असलेला आणि सध्या दिल्लीत नोकरीला असलेल्या इरफान खानला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशात मूकबधिरांचे धर्मांतर केल्याचा आरोप त्याच्यावर असून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने पकडलेल्या तीन संशयितामध्ये  इरफान खाजाखा पठाण याचा देखील समावेश आहे. ( Uttar Pradesh Conversion Case) मुळचा बीड जिल्ह्यातील असलेला इरफान हा दिल्लीतील केंद्रीय बालविकास मंत्रालयात इंरप्रिटेटर म्हणून काम करतो.

सिरसाळा येथील जायकवाडी वसाहतीत इरफानचे घर आहे. त्याचे वडील खाजाखा आमीरखा पठाण  हे एसटी महामंडळात नोकरीला होते, ते आता निवृत्त झाले आहेत. तर घरात वयस्कर आई असून ती आजारी आहे. या शिवाय फुरखान व इम्रानखा ही दोन भावंडे देखील त्याला आहेत.  

इरफान हा सर्वात लहान असून त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. परळीत उच्चमाध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर साईन लँग्वेज विषयात त्याने मुंबईतून पदवी मिळविली. २०१५ मध्ये त्याचा विवाह झाला, सध्या तो दिल्लीत असून चार वर्षांपासून केंद्रीय बालविकास मंत्रालयात नोकरीलाही आहे.

तीन महिन्यांपूर्वी आला होता..

तीन महिन्यांपूर्वी इरफान गावात आला होता, अशी माहिती त्याचे काका खुदबोद्दीन यांनी दिली आहे.  मात्र त्याच्यावर असलेले आरोप कुटुंबियांनी फेटाळून लावले आहेत.  हा प्रकार कळल्यानंतर धक्का बसल्याचे  त्याच्या भावाने सांगितले.  तो एक चांगला मुलगा असल्याचे सांगत असे काम तो करूच शकत नाही, असा दावा देखील त्याने केला आहे.

सत्य चौकशीत समोर येईलच तेव्हा कळेल, असे त्याचे काका खुदबोदीन पठाण यांनी म्हटले आहे.  दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान खान याचे कौतुक केले होते.

यापूर्वी पुणे येथील बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात जबियोद्दीन अन्सारी याचा थेट संबंध तपासात उघड झाला होता. तर, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील अबू जिन्दाल याचा थेट संबंध असल्याचे उघडकीस आले होते.  मागच्या काही दिवसांपूर्वी गाजलेल्या टूलकीट प्रकरणातही बीड जिल्ह्यातील अभियंता असलेल्या शंतनू मुळूक याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने अटक केलेल्या तिघांत सिरसाळा येथील इरफानखान खाजाखान पठाण याचे नाव आल्याने बीड जिल्हा हादरून गेला आहे.

हे ही वाचा ः माझी मानहानी झाली, त्या रिक्षाचालकाची आमदार दानवे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख