शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे, आरोग्य सुविधांसाठी इम्तियाज जलील यांची खंडपीठात याचिका - Imtiaz Jalil's public interest litigation in government hospital vacancies, health facilities | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे, आरोग्य सुविधांसाठी इम्तियाज जलील यांची खंडपीठात याचिका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे कशी भरणार आणि वैद्यकीय सुविधा कशा उभारणार याबाबत शपथपत्र दाखल करा असेही खंडपीठाने केंद्र आणि राज्य शासनाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

औरंगाबाद ःकोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रिक्त पदांसह आरोग्य यंत्रणेसमोरील सोयीसुविधांच्या उणीवांचा पाढाच एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी औरंगाबाद खंडपीठात वाचला. खासदार इम्तियाज यांनी पार्टी इन पर्सन जनहित याचिका दाखल केली.

सुनावणीदरम्यान खंडपीठाचे न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी केंद्र आणि राज्य शासनाला नोटीस बजावण्याचे आदेश मंगळवारी (ता.४) दिले आहेत. सदर याचिकेवर पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.

आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे कशी भरणार आणि वैद्यकीय सुविधा कशा उभारणार याबाबत शपथपत्र दाखल करा असेही खंडपीठाने केंद्र आणि राज्य शासनाला दिलेल्या आदेशात म्हटले आहे. जलील यांनी याचिका दाखल करत मंगळवारी ऑनलाईन सुनावणीवेळी व्यक्तिशः बाजू मांडली.

कोरोनाच्या सर्व रुग्णांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पहिले.

वेळोवेळी उचलला मुद्दा..

इम्तियाज जलील यांनी कोरोनाची पहिली लाट शहरात आली, तेव्हापासून शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे, आणि आरोग्य सुविधांचा अभाव या विषयी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर कठोर टीका केली होती.

शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना शासकीय वैद्यकीय रुग्णालय (घाटीतील) डाॅक्टर, नर्स, टेक्निशियन व इतर रिक्तपदांचा मुद्दा इम्तियाज यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत उपस्थित केला होता.

या शिवाय घाटीत असलेली सुसज्ज अशी सुपरस्पेशालिटी हाॅस्पीटलची इमारत केवळ पदांना मंजुरी नाही म्हणून पडून आहे. कोरोना सारख्या काळात देखील या इमारतीचा उपयोग रुग्णांना सेवा देण्यासाठी होत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेऊन या इमारतीत दोनशे खाटांची व्यवस्था केली. 

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख