प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची इम्तियाज जलील यांना सवयच.. - Imtiaz Jalil should not be duplicitous by gathering crowds during the Corona period | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची इम्तियाज जलील यांना सवयच..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

फिरोजच्या नातेवाईक व या भागातील नागरिकांनी पोलिसांवर काही गंभीर आरोप केले आहेत. तो आता तपासाचा भाग आहे, तो पोलिस करतील.

औरंगाबाद ः गुरुगोविंदसिंहपुरा भागातील सलून चालक तरूणाचा झालेला मृत्यू दुर्दैवी आहेच, त्याच्याबद्दल आम्हालाही सहानुभूती आहे. त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला की, अन्य कारणाने हे पोलिस तापसात उघड होईल. पण या आडून  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कोरोना काळात पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करून कायदा धाब्यावर बसवला. एकीकडे कारवाई करा असे म्हणत कायद्याची भाषा करायची आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरून जमाव जमवायचा, पोलिसांवर दबाव आणायचा ही दुटप्पी भूमिका चालणार नाही, अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.

कोरोना निर्बंध असतांना फिरोज खान कदीर खान या सलून चालकाने दुकान सुरू ठेवली होती. या कारणावरून पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. पोलिस स्टेशनमध्ये नेतांना तो अचानक खाली पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पण फिरोजच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीमुळेच त्यांचा जीव गेल्याचा आरोप करत काल पोलिस ठाण्यासमोर प्रचंड गर्दी केली होती.

पोलिस अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत नातेवाईक व या भागातील नागरिकांनी फिरोजचा मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवला होता. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील घटनास्थळी येऊन पोलिासांवर कारवाईची मागणी केली. आता पोलिस स्टेशनसमोर कोरोना काळात शेकडोची गर्दी जमवली म्हणून शिवसेनेने खासदार इम्तियाज जलील यांच्यावर तोंडसुख घेतले आहे.

आमदार अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्या दुटप्पी भुमिकेवर बोट ठेवत त्यांना खडेबोल सुनावले आहेत. दानवे म्हणाले, झालेली घटना दुर्दैवी आहे, फिरोज यांच्या मृत्यूचे दुःख जेवढे इम्तियाज जलील किंवा त्यांच्या एमआयएमला झाले आहे, त्यापेक्षा अधिक आम्हाला झाले आहे. पण या देशात कायदा आहे. पोलिसा कायद्यानूसार तपास करून योग्य कारवाई करतील यात शंका नाही.

फिरोजच्या नातेवाईक व या भागातील नागरिकांनी पोलिसांवर काही गंभीर आरोप केले आहेत. तो आता तपासाचा भाग आहे, तो पोलिस करतील. पण या संवेदनशील प्रकरणाचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. दररोज हजारो नवे रुग्ण आढळत आहेत, तर वीस ते पंचवीस जणांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.

बेजबाबदारपणाचे प्रदर्शन ..

त्यामुळे कोरोनाचे निर्बंध सगळ्यांना पाळणे, मास्क वारपणे, गर्दी टाळणे या मुलभूत गोष्टींचे पालन गरजेचे आहे. परंतु एक लोकप्रतिनिधी म्हणून याची जाणीव इम्तियाज जलील यांना असणे अपेक्षित होते. परंतु प्रत्येक वेळी राजकारण करण्याची सवय लागल्यामुळेच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन शेकडोंची गर्दी जमवत बेजबाबदारपणाचे प्रदर्शन घडवले.

लाॅकडाऊनचा निर्णय प्रशासनाने रद्द केला तेव्हा देखील जणू आपण मोर्चा काढण्याची घोषणा केली म्हणूनच लाॅकडाऊन रद्द करण्यात आल्याचा समज करून घेत इम्तियाज जलील यांनी विजयोत्सव साजरा केला होता. हजारो समर्थकांना सोबत घेत, मास्क न घालता त्यांनी काढलेली मिरवणूक त्यांच्या अंगलट देखील आली होती.

या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर इतर राजकीय पक्षांच्या कार्यक्रम, नेत्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत यांना कायदा नाही का? यांच्यावर गुन्हे का दाखल केले जात नाही, असे म्हणत कारवाईची भाषा इम्तियाज जलील करत होते. मग काल त्यांना कायद्याचा आणि कारवाईचा विसर पडला होता का? असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी केला. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख