इम्तियाज जलील, खैरेंवर निशाना साधत हर्षवर्धन जाधव पुन्हा मैदानात..

महापालिका निवडणुकीत एमआयएम, शिवसेना, भाजप, मनसे वंचित बहुजन आघाडी अशी पंचरंगी लढत अपेक्षित असतांना त्यात आपलेही अस्तित्व राहावे यासाठी जाधव यांनी आतापासूनच इम्तियाज जलील व खैरे यांना लक्ष्य केल्याचे दिसते.
Mp Imtiaz Jalil-Chandrakant Khaire-Harshavardhan Jadhav Politicl News
Mp Imtiaz Jalil-Chandrakant Khaire-Harshavardhan Jadhav Politicl News

औरंगाबाद ः कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुणे येथील वृद्ध दाम्पत्याला मारहाण प्रकरणात जामीनावर सुटून आले आहेत. सुप्रीम कोर्टातून जामीन मिळवल्यानंतर जाधव राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहे. कन्नड-सोयगांव मतदारसंघासोबतच आगामी आौरंगाबाद महापालिकेत उतरण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. शहरातील विकासाच्या प्रश्नांसोबतच त्यांनी जिल्ह्याचे आजी-माजी खासदार इम्तियाज जलील व चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इम्तियाज जलील हे खैरेंचे चेले आहेत, खैरे यांनीच जलील यांना लोकसभा निवडणुकीत उभे केले होते, असा दावा केला आहे.

राजकारणात टायमिंग साधत खळबळ उडवून देण्यात हर्षवर्धन जाधव यांचा हातखंडा आहे. त्यांचा आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत हे वारंवार सिद्ध झाले आहे. दीड महिना तुरुंगवास भोगून आल्यानंतर ते आपली मैत्रीण ईशा झा यांच्या सोबत मतदारसंघ आणि औरंगाबाद शहरात पुन्हा चाचपणी करत आहेत. वीज कनेक्शन तोडले जात असल्याच्या प्रश्नावर जाधव यांनी मतदारसंघात एल्गार मेळावे घेत आपण पुन्हा राजकारणात सक्रीय झालो असल्याचे विरोधकांना दाखवून दिले आहे.

विधानसभेच्या निवडणुकांना चार वर्षांचा अवधी असल्यामुळे मतदारसंघात बांधणी करत असतांना औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर देखील जाधव यांनी आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला तेव्हा आपण कसा शहरातील कचरा मतदारसंघात नेऊन खत तयार केले व ते शेतकऱ्यांना वाटले याची आठवण त्यांना पत्रकार परिषदेत करून दिली.

महापालिकेतील सत्ताधारी काहीच करत नाही, लोकांचे प्रश्न आहे तसेच आहेत, असे सांगत आपण काही वेगळं करू शकतो का? निवडणूक लढवायची का?याचा विचार करण्यासाठी बैठक बोलावली होती, असेही जाधव यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी आपली उपद्रव शक्ती दाखवत शिवसेनेला दणका दिला होता.

त्यामुळे शिवसेनेचे नेते जाधव यांना कितीही वेडा किंवा आम्ही त्यांना महत्व देत नाही असे म्हणत असले तरी त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीवर शिवसेना लक्ष ठेवून असते. हे जाणून असलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व शिवसेने नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर सेटींगचे आरोप केले. पण त्यांचे हे आरोप म्हणजे उघड गुपीत आहे. यावर लोकसभा निवडणुकीच्या आधी व खैरे यांच्या पराभवानंतर देखील बरीच चर्चा रंगली होती.

पण हर्षवर्धन जाधव यांनी हे जुने आरोप नव्याने करत दोघांच्याही विरोधा आघाडी उघडली आहे. महापालिका निवडणुकीत एमआयएम, शिवसेना, भाजप, मनसे वंचित बहुजन आघाडी अशी पंचरंगी लढत अपेक्षित असतांना त्यात आपलेही अस्तित्व राहावे यासाठी जाधव यांनी आतापासूनच इम्तियाज जलील व खैरे यांना लक्ष्य केल्याचे दिसते.

कोण कुणााचा चेला..

जाधव यांनी इम्तियाज जलील हे खैरेंचे चेले आहेत, खैरेंनीच त्यांना मुस्लिम मते फोडण्यासाठी लोकसभा निवडणुकीत उभे केले होते, असा आरोप केला आहे. यावर अद्याप खैरे किंवा इम्तियाज जलील यांच्याकडून कुठलेही प्रत्युत्तर आलेले नाही. बरं एवढा आरोप करूनच जाधव थांबले नाही तर औरंगाबाद की संभाजीनगर या वादाच्या मुद्यात उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब सेक्युलर नव्हता या भूमिकेला पाठिंबा दर्शवत इम्तियाज जलील याना टोला लगावला आहे.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या खैरेंचा पराभव झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी खासदार इम्तियाज जलील यांना मारलेली मिठी आणि दिलेल्या शुभेच्छा औरंगाबादकर अजूनही विसरलेले नाहीत. त्यामुळे आज जरी इम्तियाज जलील हे खैरेंचे चेले आहेत असा आरोप जाधव करत असले तरी त्यांच्या या आरोपानंतर नेमकं कोण कुणाचा चेला आहे, यावर जिल्ह्यात चर्चा मात्र सुरू झाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com