नोटा मी उधळल्या नाहीत, मला टार्गेट केलं जातयं.. - I'm not scattering notes, I'm being targeted. | Politics Marathi News - Sarkarnama

नोटा मी उधळल्या नाहीत, मला टार्गेट केलं जातयं..

जगदीश पानसरे
सोमवार, 5 जुलै 2021

पोलिस प्रशासनाला सत्ताधारी पक्षाने घेतलेले जाहीर राजकीय कार्यक्रम, पक्ष प्रवेश सोहळे दिसत नाहीत, तेव्हा त्यांचे डोळे बंद असतात.

औरंगाबाद ः राज्याच्या सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या पक्षांना खूष करण्यासाठी पोलिसांकडून मला मुद्दाम टार्गेट केले जात आहे. पण मी घाबरेन, कुणाच्या पाया पडायला जाईल, असे जर कुणाला वाटत असेल तर त्यांनी ते विसरावे. शहरात आणि राज्यात अनेक राजकीय कार्यक्रम, पक्ष प्रवेश सोहळे घेतले जात आहेत. तिथे सगळे नियम पायदळी तुडवले जात असतांना कायद्याचा धाक फक्त मला दाखवला जातो, सगळे नियम माझ्यासाठीच आहे, असे सगळे सुरू आहे. (I'm not scattering notes, I'm being targeted.) कारवाई करायची असले तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवरही करा, असे आव्हान इम्तियाज जलील यांनी पोलिस प्रशासनाला दिले.

ज्या कार्यक्रमावरून गदारोळ आणि कारवाईची मागणी केली जात आहे, तो आमच्या पक्षातील कोरोना काळात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी शहराच्या बाहेर घेण्यात आला होता. (AIMIM Mp Imtiaz Jalil Aurangabad) काही उत्साही समर्थकांनी माझ्यावर नोटा उधळल्या, मी नाही, असेही इम्तियाज यांनी स्पष्ट केले. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एका कव्वालीच्या कार्यक्रमात सहभागी झाले असतांना त्यांच्यावर नोटांची उधळण केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

यावरून कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांसह ६० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. खासदार इम्तियाज जलील यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावरही कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे. कोरोनाचे निर्बंध असतांना सगळे नियम पायदळी तुडवत कव्वालीचा कार्यक्रम घेऊन त्यात इम्तियाज जलील हे देखील सहभागी झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.

मात्र ही टीका आणि कारवाईची मागणी करणारे आपल्याला लक्ष्य करत आहेत, असा आरोप इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले, मला दाबण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न पोलिसांना हाताशी धरून सत्ताधारी पक्ष करत आहे. पण मी कुणाला घाबरणार नाही आणि कुणाच्या पायाही पडणार नाही. कव्वालीच्या कार्यक्रमातील माझ्या सहभागावरून जो गदारोळ सुरू आहे, तो चुकीचा आणि हेतुपूरस्पर केला जात आहे. माझ्या बाबतीत सजग असलेल्या पोलिस प्रशासनाला सत्ताधारी पक्षाने घेतलेले जाहीर राजकीय कार्यक्रम, पक्ष प्रवेश सोहळे दिसत नाहीत, तेव्हा त्यांचे डोळे बंद असतात.

पण मी कुठे काय करतो, याकडे मात्र त्यांचे बारकाईने लक्ष असते. तेव्हा काही गोष्टींकडे मी देखील पोलिसांचे लक्ष वेधू इच्छितो. शिवसेनेच्या वर्धापनदिनी शहराच्या मुख्य भाग असलेल्या चौकात मोठा जाहीर कार्यक्रम झाला. २५ लोकांची परवानगी मिळाल्याचा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता, प्रत्यक्षात तिथे शेकडो लोक जमा झाले होते, विशेष म्हणजे अनेकांनी मास्क देखील घातलेले नव्हते. पण पोलिसांचे त्याकडे लक्ष गेले नाही, कारण तो सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम होता.

सत्ताधाऱ्यांना वेगळा नियम?

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांनी देखील जाहीर पक्ष प्रवेश सोहळे घेतले, तिथेही कोरोनाचे नियम पाळले गेले नाही, पण त्याबबातही पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. केवळ औरंगाबादेतच नाही तर राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांचे मेळावे, बैठका, दौरे होत आहेत. त्यांच्यावर देखील कुठलीच कारवाई किंवा कोरोना नियम पायदळी तुडवले म्हणून गुन्हे दाखल झाल्याचे पाहण्यात आले नाही.

काॅंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील सोलापूरात जाहिर कार्यक्रम घेतला, तिथेही कुणी मास्क, सोशल डिस्टन्सचे नियम पाळले नाही. मग पोलिस प्रशासन किंवा राज्य सरकारने त्यांच्यावर काय कारवाई केली? या सगळ्या कार्यक्रमांचे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध आहेत. पोलिसांना ते दिसत नसतील तर मी पाठवतो. मग सत्ताधारी पक्ष व त्यांच्या नेते, लोकप्रतिनिधींसाठी वेगळे नियम आणि इम्तियाज जलीलसाठी वेगळे आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मला मुद्दामहून टार्गेट केले जात आहे, पण मी दबावाला बळी पडणार नाही, याचा पुनरुच्चार देखील इम्तियाज जलील यांनी केला.

हे ही वाचा ः न्यायालयाच्या निकालाने देशभरातील ओबीसींचे आरक्षण शून्य टक्यांवर..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख