वाळु माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कलेक्टर, एसपी थेट गोदापात्रात

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी मध्यरात्री विना अंबरदिव्याच्या जिपमधून गोदापात्रात पोचले. सात हायवा ताब्यात घेण्यात आले.
वाळु माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी कलेक्टर, एसपी थेट गोदापात्रात
Sand Mafiya- Collector- Sp News Beed

बीड : जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूकीचा मुद्दा चव्हाट्यावर आलेला आहे. महसूल व पोलिसांसोबतच्या मिलीभगतीमुळे सर्रास होणाऱ्या वाळू उपशामुळे प्रशासनही बदनाम होत आहे. याच अवैध वाळू वाहतूक व उपशाविरुद्ध कारवाईसाठी ऐन मध्यरात्री खुद्द जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी गोदापात्रात पोचले. यावेळी कारवाईत नऊ हायवा आणि एक जीप ताब्यात घेण्यात आली.

जिल्ह्यात गोदापात्रासह सिंदफणा व इतर नद्यांमधून सर्रास अवैध वाळू उपसा व वाहतूक होत आहे. या व्यवसायात असलेल्यांचे महसूल व पोलिस विभागातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यानेच सर्रास वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या कायम तक्रारी व चर्चा आहेत.

सोशल मिडीयावरुन या विभागांची या कारणाने पुरती बदनामीही झाली आहे. अगदी मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि आयुक्तांपर्यंत तक्रारींचे पाढे असताना अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.

धडक कारवाईत हायवा, स्कार्पिओ जप्त..

अधून-मधून कारवाया होत असल्या तरी कारवायांबद्दलही शंकाच असते. ‘हप्तोखोरीमुळेच वाळू उपसा व वाहतूक’ अशा पोलिस बारमाही सोशल मिडीयावर पडतात. दरम्यान, याच सर्व मुद्द्यांमुळे नव्याने रुजू झालेले जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी या विषयात लक्ष घातले.

या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी त्यांनी बुधवारी रात्री १२ वाजता पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांना घेऊन गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन गाठले. वाळू वाहतूक व उपसा करणाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी वाहनही साधे (अंबर दिवा नसलेले) वापरले.

त्यांच्यासह पोलिस अधीक्षकांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास हजारे यांचेही पथक होते. काही वेळानंतर गेवराईचे तहसिलदार श्री. खाडे देखील अधिकाऱ्यांसह पोचले. दरम्यान, या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारे सात हायवा व एक जीप ताब्यात घेण्यात आली आहे. आता या कारवाईने काही फरक पडणार आहे की पहिले पाढे पंचावन्न हे पहावे लागेल.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in