पाणी देऊ शकत नसाल तर बैठका कशाला? मंत्री असतांना काय केले? - If you can't provide water, why the fuss of meetings? | Politics Marathi News - Sarkarnama

पाणी देऊ शकत नसाल तर बैठका कशाला? मंत्री असतांना काय केले?

जगदीश पानसरे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

बीड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूरला उजणीचे पाणी मिळावे यासाठी आम्ही सातत्याने मागणी करतो आहोत. बैठकीत या विषयावर बोलायचे नसले आणि तुम्ही उजणीचे पाणी आम्हाला देऊ शकत नसाल तर आम्हाल या बैठकाच मान्य नाही.

औरंगाबाद ः मराठवाड्याच्या प्रश्नावर बैठक होत असतांना पाण्याचा प्रश्न मांडायचा नाही, अर्ध्या तासात जिल्ह्याचे प्रश्न मांडता येतात का? काहीही मागितले की केंद्राकडून पैसे आले नाही सांगून वेळ मारून न्यायची. उजणीनचे पाणी मराठवाड्यातील बीड, लातूर उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्याला मिळाले पाहिजे, यावर देखील इथे काय बोलणार म्हणून उपमुख्यमंत्री टाळाटाळ करतात, पाणी देऊ शकत नसाल तर मग आम्हाला या बैठका मान्य नाहीत, अशी टीका माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. त्याला पाच वर्ष मंत्री होतात तेव्हा काय केले? असा सवाल करत अजित पवारांनी देखील पलटवार केला.

मराठवाडा विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) २०२१-२२ प्रारूप आराखड्याच्या अनुषंगाने राज्याचे वित्त व नियोजनमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी औरंगाबादेत बैठक घेतली. यासाठी मराठवाड्यातील अनेक मंत्री व लोकप्रतिनिधी आपापल्या मागण्या आणि प्रश्न घेऊन आले होते.

प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ देण्यात आला होता. भाजपचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बैठकीत उजणीचे पाणी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळाले पाहिजे अशी, मागणी लावून धरली. यावर अजित पवारांनी उजणीच्या पाण्यावर इथे काय बोलायचे म्हणत या विषयावर अधिक बोलणे टाळले.

यावर बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना निलंगेकर यांनी नाराजी व्यक्त केली. निलंगकेर म्हणाले, ही बैठक म्हणजे खोटारडे पणा आहे, अर्ध्या तासात कुठल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडता येतात का? कुठलीही मागणी केली की हे केंद्राकडे बोट दाखवतात, केंद्राकडून पैसे आले नाही म्हणून सांगतात. जे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत त्याबद्दल तर बोला, आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील तुम्ही केंद्राकडून पैसे आले नाही हेच सांगणार असाल तर मग अशा बैठकांना काय अर्थ आहे.

बीड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूरला उजणीचे पाणी मिळावे यासाठी आम्ही सातत्याने मागणी करतो आहोत. बैठकीत या विषयावर बोलायचे नसले आणि तुम्ही उजणीचे पाणी आम्हाला देऊ शकत नसाल तर आम्हाल या बैठकाच मान्य नाही, आम्ही बहिष्कार करतो, अशा शब्दांत निलंगेकरांनी संताप व्यक्त केला.

तुम्हाला कुणी अडवले होते?

या संदर्भात अजित पवार यांना पत्रकार परिषदेत विचारले तेव्हा, त्यांनी निलंगेकरांना तुम्ही राज्यात पाच वर्ष मंत्री होतात, जिल्ह्याचे पालकमंत्री होता, राज्यात आणि केंद्रातही तुमचे सरकार होते. मग तुम्ही काय केले? असा सवाल करत टोला लगावला. संभाजीराव निलंगेकर हे पाच वर्ष कॅबिनेट मंत्री होते, त्यावेळी त्यांना कुणी अडवले होते का?

केंद्रात आणि राज्यातही त्यांचेच सरकार होते. ते स्वत: तिथले पालकमंत्री होते. स्वतःला संधी मिळते तेंव्हा काही करायचे नाही अन् दुसऱ्याच्या नावाने ढूसण्या मारत बसायचे हे धंदे आता बंद करावेत. महाविकास आघाडीचे सरकार सर्व राज्याचा विचार करून निर्णय घेत असते. पाण्याचा विषय गंभीरच आहे. हा विषय कॅबिनेटसमोरचा विषय आहे, तिथे याबाबत निर्णय घेतला जाईल.

केंद्राकडचे २८ हजार कोटी हक्काचे मिळाले नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सभागृहात हा मुद्दा मांडला तेव्हा तो कोणीही खोडला नाही. राज्यांचा वाटा मिळालाच नाही. कोरोनाचा परिणाम आहे. केंद्राने खासदारांची साडे तीन हजार कोटीपेक्षा जास्तीची रक्कम कपात केली. का केली कपात, ही रक्कम वेगवेगळ्या राज्यांना मिळाली असती याचे संभाजीरावांनी उत्तर द्यावे, मग दुसऱ्यांवर बोलावे, असेही अजित पवार म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख